सुरगाणा तालुक्यातील माणी येथील जंगल परिसरात अधिवासाच्या वर्चस्ववादातून दोन बिबट्यांमध्ये लढाई होऊन सहा महिन्याच्या एका नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिबट्यावर सुरगाण्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय आवारात अंतिम संस्कार करण्यात आले. माणी येथील कन्या शासकीय आश्रमशाळेजवळील रामदास चौधरी यांच्या मालकीच्या शेतात सहा महिने वयाच्या बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे गुरूवारी ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी वनविभागाला माहिती दिली.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक कृष्णा भंवर, सहायक उपवनसंरक्षक उमेश वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दोन बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले. जंगलात वन्यजीव यांच्या अधिवासाच्या हद्दी ठरलेल्या असतात. दोन नर बिबटे समोरासमोर आले असावेत आणि दोघांमध्ये भांडण झाले असावे. आपल्या अधिवास हद्दीत दुसऱ्याने प्रवेश केल्याने प्रथमदर्शनी वन्यजीव अधिवास वर्चस्ववादी लढाईत सहा महिने वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज सुरगाणा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी व्यक्त केला. घटनास्थळी पंचनामा झाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार आहे. दरम्यान, खोकरविहीर, तातापाणी, पिंपळसोंड, सोनगीर, कुकूडणे, रघतविहीर, मांधा, खुंटविहीर, करंजुल, हडकाईचोंड, केम पर्वत या जंगलातील भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे.