धुळे: शहरातील नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून संचार करणारा बिबट्या अखेर भक्ष्याच्या शोधात आसाराम बापू आश्रमातील गोठ्याकडे आला आणि पिंजऱ्यात बंद झाला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी निःश्वास सोडला. धुळे शहरालगत असलेल्या नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. समाज माध्यमातून परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या चित्रफितीही फिरु लागल्या होत्या. परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमी झाली. एका वासरावरही बिबट्याने हल्ला केल्याने रहिवाशांमध्ये भीती वाढली होती. ज्या ठिकाणी बिबट्या दिसत असे, त्या ठिकाणी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे लावल्यावरही बिबट्या नंतर त्या ठिकाणी न दिसल्याने वन विभागाकडून परिसरातील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. बिबट्या सतत जागा बदलत असल्याने वन अधिकाऱ्यांनाही त्याचा ठावठिकाणा समजत नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

ज्या ठिकाणी एका वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी वन अधिकारी भूषण वाघ यांनी गुरांच्या गोठ्याच्या बाजूलाच आसाराम बापू आश्रमात ट्रॅप कॅमेरा आणि भक्ष्यासह पिंजराही लावला. ज्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच जागेवर तेच वासरू भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. रात्री बिबट्या त्या ठिकाणी आला. त्याने पिंजऱ्यात शिरकाव केला आणि तो बंद झाला. गुरुवारी सकाळी वन अधिकाऱ्यांच्या पथकाने बंद झालेला बिबट्या सुरक्षितस्थळी हलविला. मुख्य वन संरक्षक निनू सोमराज, उप वन संरक्षक नितीन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्ण झाली. १५ दिवस भीतीच्या छायेत काढलेल्या परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard roaming in dhule city caged by forest department from nakane lake area css