नाशिक : शहरातील गंगापूर रोड परिसरातील रामेश्वर नगरात बुधवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळल्याने वन विभागाकडून शोध मोहीम राबविण्यात आली. परिसरात तीन तासापेक्षा अधिक वेळ शोध घेऊनही बिबट्याचा माग वन विभागाला काढता न आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे.
पाईपलाईन रोड, रामेश्वर नगर भागात बुधवारी सकाळी बिबट्या फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनपाल उत्तम पाटील आदी संबंधित ठिकाणी पोहचले. वनविभागाच्या दोन पथकांनी पाईपलाईन रस्त्यावरील विविध भागात बिबट्याचा शोध घेतला. रामेश्वर नगरातील उद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडीझुडपांजवळ फटाके वाजवण्यात आले. जेणेकरून कुठे बिबट्या लपला असेल तर, आवाजाने बाहेर पडेल. परंतु, बिबट्या आढळला नाही. पाईपलाईन रस्त्यावरील एका बंद पडलेल्या लॉन्सच्या पाठीमागील बाजूस वाढलेल्या झाडीझुडपात वन पथकाला एका भटक्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. याच परिसरातील एका बंगल्याच्या सीसीटीव्ही चित्रणात बिबट्याचा परिसरातील वावर आढळून आला. वन विभाग सजग असून नागरिकांनी रात्री बाहेर फिरतांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा… धुळ्यात आरोग्य मित्रांवर पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा विनावेतन भार, वेतनासाठी अन्नत्यागाचा निर्णय
जिल्ह्यात वारंवार बिबट्याचा वावर
काही दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात वारंवार बिबट्याचा वावर आढळून येत आहे. नाशिकरोड, जयभवानी रस्ता, दिंडोरी, पिंपळगाव खांब आदी ठिकाणी बिबट्या दिसला आहे. जलालपूर शिवारात दोन बिबट्यांची झुंज झाली असता एका बिबट्याचा झुंजीत मृत्यू झाला. काही ठिकाणी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. दिवाळीत तर सिडको आणि गोविंद नगर या मानवी वस्तीत बिबट्याने शिरकाव करत वनविभागाला जेरीस आणले होते.
हेही वाचा… अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण वादात, रावेर, यावल, फैजपूर, सावद्याला वगळल्यामुळे विरोध
बिबट्याचा वावर जिल्ह्यात वाढला आहे. शेतांमधील पिकांची तोडणी सुरू आहे. दुसरीकडे हा काळ बिबट्याच्या स्थलांतराचा आहे. यामुळे बिबट्या इतरत्र ये-जा करत आहेत. वनक्षेत्र कमी होत असताना बिबट्यांची संख्या वाढली आहे. यामुळे काही दिवसात बिबट्याचा वावर वाढला आहे. – वृशाली गाढे (वनपरिक्षेत्र अधिकारी)