नाशिक : मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात बिबट्याच्या मुक्त संचाराची घटना ताजी असतानाच सावरकरनगरच्या गोदा काठावरील आसारामबापू आश्रम परिसरात बिबट्या दिसला. माहिती मिळताच पोलिसांसह वन विभागाच्या पथकाने धाव घेतली. परिसरात भ्रमंती करणाऱ्या नागरिकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली. पथकाने फटाके फोडून बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष आणि ऊस वा तत्सम लपणक्षेत्र कमी झाल्यामुळे शहरालगतच्या नागरी वस्तीत तो वारंवार दिसत असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच मखमलाबादच्या वडजाईमातानगर भागात बिबट्या दिसला होता. मंगळवारी सावरकरनगरातील गोदावरी नदीलगत असणाऱ्या आश्रम परिसरात त्याची पुनरावृत्ती झाली. कर्मचाऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती पोलीस, वन विभागाला दिली. आश्रमालगतच्या विश्वास लॉन्स रस्त्यावर सकाळी भ्रमंतीसाठी बरेच जण येतात. गंगापूर पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून संबंधितांना या क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले. वन विभागाच्या पथकाने परिसरातील झाडी-झुडपांमध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फटाके फोडण्यात आले. परंतु, तो सापडला नाही, असे वन विभागाच्या अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले.

हेही वाचा…नाशिकमध्ये मराठी विरुद्ध अमराठी, व्यावसायिकांमध्ये धुसफूस, वादात मनसेची उडी

बिबट्यामुळे शहरात आजवर वेगवेगळ्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. उन्हाळ्यात बिबट्या वारंवार दिसत आहे. यामागे जंगल परिसरात पाण्याची कमतरता, उन्हाळ्यात ऊस वा तत्सम लपण्यासारख्या जागांचे घटलेले क्षेत्र आणि नागरी वस्तीजवळ आहाराची सहज उपलब्धता, अशी काही कारणे असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगतात. मागील काही दिवसांत मखमलाबाद, दरी-मातोरी, मुंगसरे, तोफखान्याचे लष्करी क्षेत्र, सय्यद पिंप्री आदी भागात बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले.

हेही वाचा…धुळे : बालिकेच्या मृत्युनंतर नाल्यात प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

वन विभागाकडून सूचना

बिबट्यापासून संरक्षणासाठी नागरिकांनी पाळीव प्राणी बंदिस्त जागी ठेवणे, घराबाहेरील परिसर दिव्यांनी प्रकाशमान राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे. मोठ्या आवाजाने (फटाके) त्याला पळवून लावता येते. वारंवार बिबट्या दिसणाऱ्या भागात घराभोवती संरक्षक भिंत उभारणे महत्वाचे ठरते, याकडे वन विभागाकडून लक्ष वेधले जात आहे. पाळीव प्राणी बंदिस्त केले तरी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे बिबट्याला सहज आहार मिळू शकतो. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard spotted in nashik s savarkar nagar near asharam bapu ashram forest department issue caution psg