जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात बुधवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक बिबट्या अडकला. घटनेच्या २४ तासाच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात तीन मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. बुधवारी मध्यरात्री शेजारील केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून आईच्या कुशीत झोपलेल्या रत्ना रूपनवार (ठेलारी) या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेले.

मेंढपाळांनी परिसरातील केळी बागांमध्ये बालिकेचा शोध घेतला असता, काही अंतरावरच त्यांना तिचा शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी करण्यात येऊ लागली. लोकप्रतिनिधींनीही त्यासंदर्भात वन विभागाला सूचना केल्या होत्या.

दरम्यान, तोंडाला रक्त लागलेला बिबट्या बालिकेचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पुन्हा येण्याची दाट शक्यता गृहीत धरून यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील हे पथकासह गुरूवारी दिवसभर घटनास्थळी थांबून होते. याशिवाय, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. पैकी दोन पिंजऱ्यांमध्ये मेंढ्या ठेवून उर्वरित दोन पिंजऱ्यांमध्ये वन विभागाचे कर्मचारी बसले होते.

गुरूवारी रात्री उशिरा बिबट्या ठरल्याप्रमाणे एका पिंजऱ्याजवळ पोहोचताच, वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्याच्या जवळील बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन त्याला दिले. त्यानंतर काही वेळातच बिबट्या बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्यानंतर त्यास तातडीने पिंजऱ्यात अडकविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदर बिबट्याची रवानगी आता नागपूर येथील प्राणी संग्रहालयात केली जाणार असल्याची माहिती उपवन संरक्षक जमीर शेख यांनी दिली. नरभक्षक बिबट्याला पकडण्यात आल्याने शेत शिवारातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.