लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : शहर परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. गुरूद्वाराच्या पाठिमागे आययुडीपी परिसरात असलेल्या मळ्यात बिबट्याने तळ ठोकला होता. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला. त्यामुळे मनमाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, दोन दिवसांत पुन्हा दुसरा बिबट्या मनमाडमध्ये दिसला आहे.

प्रारंभी वागदड रोड, गुडविल स्कूल, रापली गेट, वडगांव पंगु शिवारात नजरेस पडणारा बिबट्या आता मनमाड शहराजवळील आययुडीपीतून जवळच्या मळ्यात दिसला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाडला धाव घेतली. परिसरात पाहणी करून मळ्यात पिंजरा लावला.

दरम्यान, गुरूवारी रात्री आययुडीपी परिसरात शिव मंदिराच्या पाठीमागून गुरूद्वाराच्या मागील मळ्यात बिबट्याला काही जणांनी पाहिले. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा आययुडीपीतील मळ्यात वन विभागाने पिंजरा लावला. वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सोनाली वाघ, वनसेवक इरफान सय्यद, प्राणीमित्र विजय उगले, गुरूद्वारा सेवेकरी आदी उपस्थित होते.

वन विभागाचे आवाहन

नागरिकांनी बिबट्या दिसलेल्या भागात गर्दी करू नये, हुल्लडबाजी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. मळ्याच्या भिंतीवरून डोकावून, अथवा उभे राहून बिबट्याला जेरीस आणू नये, कारण तो गर्दीमुळे अधिक हिंस्त्र होईल व शेताच्या कुंपणाबाहेर येऊन गोंधळ माजवेल. बिबट्या लवकरच पिंजऱ्यात बंद होईल, तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे