नाशिक – शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शहरातील रहिवासी भागात अलीकडेच दोन बिबटे पकडण्यात आले असता मखमलाबाद परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने त्वरीत बिबट्याला जाळ्यात अडकवावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
शुक्रवारी सिडकोतील सावता नगर परिसरात बिबट्या दिसला होता, या बिबट्याला जेरबंद करतांना वनविभागाचे नाकी नऊ आले असताना त्याचवेळी गोविंदनगर परिसरातही बिबट्या आढळल्याने रहिवासी धास्तावले. वन विभागालाही एकाचवेळी दोन बिबटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी जेरबंद करताना कसरत करावी लागली. गोविंदनगरात ज्या घरात बिबट्या शिरला होता, त्या घरमालकाच्या सतर्कतेने वन विभागाचे काम काहीसे सोपे झाले होते. अवघ्या काही तासात दोन्ही बिबटे जेरबंद झाले होते. या प्रकाराची चर्चा थांबते न थांबते तोच रविवारी मखमलाबाद येथील गंगावाडी पाट परिसरात वाहनधारकांना बिबट्या दिसला. काही जणांनी त्याचे भ्रमणध्वनीत चित्रीकरणही केले. पाट परिसरातून बिबट्या मखमलाबाद गावाकडे पळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>नाशिक: लखमापूरमध्ये दुकानांना आग
दरम्यान, वन विभागाकडून या प्रकाराची शहानिशा करण्यात आली असता परिसरात बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. या विषयी वन अधिकारी वृक्षाली गाडे यांनी माहिती दिली. मखमलाबाद परिसर मळ्याचा असल्याने बिबट्याचा हा अधिवास आहे. मळा, शेत किंवा शिवार परिसरात बिबट्या आढळतो. दूरध्वनीवरून सातत्याने वनविभागाला यासंदर्भात माहिती मिळत असते. परंतु, या ठिकाणी पिंजरा लावता येणार नाही, असे गाडे यांनी सांगितले. वन विभागाच्या या भूमिकेबद्दल परिसरातील रहिवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून पिंजरा लावता येत नसल्यास पर्यायी मार्ग अवलंबून बिबट्याला सापळ्यात अडकवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.