नाशिक : भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दावेदारीमुळे महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक लोकसभेची जागा अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाला मिळाली. प्रचारास फारसा कालावधी राहिला नसल्याने शिंदे गटाने नव्या चेहऱ्याचा विचार न करता भाजपने विरोध केलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मैदानात उतरविले. दुसरीकडे, बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी मनधरणी चालू असतानाच भाजप नेत्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी धडपड सुरु केली आहे.
बुधवारी दुपारी शिंदे गटाकडून खासदार गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली. गुरुवारी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. ही जागा शिंदे गटाकडे देण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी स्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची समजूत काढली. भुजबळ यांची बंद दाराआड चर्चा केली.
हेही वाचा…नाशिक, दिंडोरीसाठी महायुतीची शक्ती प्रदर्शनाची तयारी, दोन्ही मतदारसंघात गुरुवारी अर्ज भरणार
बुधवारी भुजबळांची भेट घेतल्यानंतर ही बाब बावनकुळे यांनी मान्य केली. नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे तडजोडीत ही जागा त्यांच्याकडे राहिली. भुजबळांना उमेदवारी न दिल्याने ओबीसी समाज नाराज असला तरी ते त्यांची समजूत काढतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही भुजबळांची भेट घेतली. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महिनाभर सहन करावा लागलेला ताण मिटल्याचे गोडसे यांनी नमूद केले.
हेही वाचा…सिद्धेश्वरानंद महाराजांकडे दीड कोटींची संपत्ती, सोन्याचा मुलामा असणारे पावणेतीन लाखाचे घड्याळ
शांतिगिरी महाराज ठाम
शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी कायम ठेवल्यास मतांचे विभाजन होऊन महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी, अशी विनंती गिरीश महाजन यांनी त्यांना केली. परंतु, महाराज निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. माघारीला वेळ असून त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाईल, असे महाजन यांनी म्हटले आहे.