अदानी उद्योग समुहात गुंतविलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे, यासह अन्य काही प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत, यासाठी बुधवारी नाशिक शहर युवा काँग्रेसच्या वतीने पत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. नाशिक शहरातून पाच हजार पत्र पंतप्रधान यांना पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जय भारत सत्याग्रह अंतर्गत युवक काँग्रेसच्या पोस्टकार्ड अभियानास बुधवारी सुरूवात झाली. नाशिक शहर युवक काँग्रेसच्या वतीने कॉलेज रोड येथे विविध समस्या तसेच अदानीबद्दलचे संबंध याबाबतीत काही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विचारण्यासाठी अभियान राबविण्यात आले. नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन भोसला परिसरात करण्यात आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> हंडा मोर्चानंतर देवरगावला टँकरव्दारे पाणी; गावात पाणी आल्याने महिलांनी व्यक्त केले समाधान
नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड आणि माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टकार्ड अभियानाची सुरुवात करण्यात आली.या देशातील युवक हा देशाच्या पंतप्रधानांना आपल्या मूलभूत हक्कांबद्दल प्रश्न विचारू शकतो. तो त्याचा मूलभूत अधिकार आहे, हे या पोस्टकार्ड अभियानातून सिद्ध करायचे असल्याचे शहराध्यक्ष छाजेड यांनी सांगितले. भविष्यात शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने असे उपक्रम जय भारत सत्याग्रहाच्या निमित्ताने राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. बच्छाव यांनी सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवक काँग्रेसतर्फे सतत केले जात असल्याचे सांगितले. जय भारत सत्याग्रहाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आश्वासन स्वप्निल पाटील यांनी दिले. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस हेमलता पाटील, नगरसेवक जॉय कांबळे, वत्सलाताई खैरे आदी उपस्थित होते.
युवा काँग्रेसने पत्राव्दारे मांडलेले प्रश्न
नीरव मोदी, ललित मोदी, पुर्णेश मोदी यातील एकही व्यक्ती इतर मागासवर्गीय नसताना त्या संबंधित समाजाचा अपमान राहुल गांधी यांनी कसा केला ?
देशातील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत असतांना युवकांचा, बेरोजगारांचा असा अमानुष छळ किती दिवस करणार ?
महागाई दिवसागणिक वाढत असतांना पंतप्रधान बेरोजगारी, महागाईविषयी का बोलत नाहीत ?
अदानी घोटाळ्यासंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर संसदिय कामकाजातून तो भाग का वगळण्यात आला?