नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे उमेदवार प्रा. दिलीप फडके आणि उपाध्यक्षपदी वैद्य विक्रांत जाधव तसेच सुनील कुटे हे विजयी झाले. प्रा. फडके यांनी आपले प्रतिस्पर्धी वसंत खैरनार यांचा ७३ मतांनी पराभव केला.
रविवारी सावानाच्या पंचवार्षिकासाठी मतदान झाले. अध्यक्ष, उपाध्यक्षसह कार्यकारी मंडळ सदस्यांच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तीन हजार ९०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोमवारी सकाळी वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी तीन हजार ९०५ मतदान झाले. ग्रंथ मित्र पॅनलचे उमेदवार असलेल्या वसंत खैरनार यांना १९०४, ग्रंथालय भूषणचे प्रा. दिलीप फडके यांना एक हजार ९७७ मते मिळाली.
२४ मते बाद झाली. प्रा. फडके हे ७३ मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल
जाहीर केल्यानंतर ग्रंथमित्रच्या वतीने आक्षेप नोंदवत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे वाद उद्भवल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुन्हा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात केली. मात्र खैरनार यांनी सामंजस्याची भूमिका घेत फडके आपले उत्तम सहकारी असून आम्ही एकदिलाने वाचनालयासाठी काम करू, असे जाहीर केल्याने पुन्हा मतपत्रिका मोजणे स्थगित करण्यात आले. या वेळी ग्रंथालय भूषणच्या समर्थकांनी ‘सावाना’च्या आवारात फटाक्यांची आतषबाजी केली.
दुसऱ्या सत्रात उपाध्यक्षपदाची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून ग्रंथालय भूषणचे वैद्य विक्रांत जाधव, प्रा. सुनील कुटे आघाडीवर होते. कुटे यांना १९८७ तर, जाधव यांना सर्वाधिक म्हणजे २०२७ मते मिळाली.
ग्रंथमित्रच्या मानसी देशमुख यांना १६९० आणि प्रा. दिलीप धोंडगे यांना एक हजार ८२६ मते मिळाली. १४० मते बाद ठरली. मंगळवारी मंडळ सदस्यपदांसाठीची मतमोजणी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा