नाशिक – नाशिकरोड रेल्वे स्थानकातील अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नववर्षात उद्वाहन व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे. जेणेकरून प्रवाश्यांना बाहेर पडण्यासाठी सध्या करावा लागणारा द्राविडी प्राणायाम काही अंशी कमी होईल. शिवाय वृद्ध व अपंग प्रवाश्यांना या फलाटावर सहजपणे ये-जा करणे सुकर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास १० महिन्यांपासून प्रगतीपथावर असणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. वार्षिक ६० कोटींहून अधिकचे उत्पन्न मिळवणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा ए १ गटात समावेश होतो. दिवसभरात या स्थानकावर १०५ हून अधिक रेल्वेगाड्या थांबतात. या ठिकाणी फलाट क्रमांक एकवर उद्वाहन आहे. तर फलाट क्रमांक चारवर एक रॅम्प आहे. मुख्य पुलास जोडणारा फलाट क्रमांक दोन, तीनवर जिना आहे. या ठिकाणी कुठलीही यांत्रिक व्यवस्था नव्हती. फलाट क्रमांक एकची लांबी कमी आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या सर्वाधिक रेल्वेगाड्या फलाट क्रमांक दोनवर येतात. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फलाट क्रमांक तीनवर येतात. म्हणजे सर्वाधिक वर्दळीचे हे फलाट आहेत. फलाट क्रमांक दोन व तीनवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मुख्य पुलाला जोडण्यासाठी उद्वाहन व सरकत्या जिन्याची आवश्यकता मांडली जात होती. त्या अनुषंगाने काम हाती घेतले गेले. फलाटावरून वरील पुलास जोडणारी उद्वाहन आहे. जानेवारीपर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार असल्याचे रेल्वेच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”

मागील कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली. स्थानकावर पूलही त्याचा एक भाग होता. आता आगामी कुंभमेळ्यापूर्वी फलाटावरून सहजपणे ये-जा करण्याची व्यवस्था या निमित्ताने आकारास येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lift and escalators at nashik road railway station soon ssb