नाशिक – कायदा जसा हिंदू धर्मियांसाठी आहे, तसाच तो इतर धर्मियांनाही आहे. केवळ हिंदूंनी नियम पाळावेत, इतरांनी ते पाळू नये, असे चालणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिला. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटविण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या अनुषंगाने त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गुरुवारी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले. राज्यात अनेक पोलीस ठाण्यांकडून इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यावर राणे यांनी आक्षेप घेतला. ज्याला अशा पार्टीला जायचे आहे, त्याने शुक्रवारी जावे. पोलीस ठाण्यातर्फे अशा आयोजनाचा प्रयत्न झाल्यास संबधितांनी कारवाईला तयार रहावे, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा – नाशिक : भाजपाचे राहुल गांधींविरोधात आंदोलन
राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरे यांचे योगदान काय, असा प्रश्न करीत त्यांनी आंदोलनावेळी उद्धव ठाकरे हे तिसऱ्या मजल्यावर कॅमेरा पुसत बसल्याचा टोला हाणला. संजय राऊत यांचा राम मंदिराच्या विरोधात लेख आहे. यांचे राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात कुठलेही योगदान नसल्याचा दावा त्यांनी केला. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला महायुती सरकार आरक्षण देणार आहे. काही भागांत जिहादी कार्यक्रम होत असून आपण जातीपातीत भांडत बसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.