नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देवळा तालुक्यातील कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हातभट्ट्या पोलिसांकडून उदध्वस्त करण्यात आल्या. देवळा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारु अड्ड्यांविरोधात मोहीम राबविण्यात आली आहे. कांचन किल्ला पायथ्याशी असलेल्या कांचने गावात टाकण्यात आलेल्या छाप्यात अवैध दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य संपूर्णतः नष्ट करण्यात आले.

या कारवाईत खर्डा विभागाचे अमलदार रामदास गवळी, शरीफ शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जमिनीत दडवून ठेवलेले अनेक पिंप पथकाकडून फोडण्यात आले. दारू निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले. खर्डा गावातील वाल्मिक सोनवणे या अवैध दारू विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छापासत्रामुळे उघड्यावर सर्रासपणे दारु निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात हे छापासत्र असेच सुरू राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Story img Loader