लघूसंदेश, ध्वनिक्षेपकावरून माहिती देणार
नाशिक : मद्य खरेदीसाठी किती मोठय़ा प्रमाणावर गर्दी उसळते हे लक्षात आल्याने आता अशी गर्दी रोखून ही प्रक्रिया शुक्रवारपासून शांततेत, नियमांचे पालन करून पार पडावी, यासाठी प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. विक्रेत्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघूसंदेशाद्वारे ग्राहकांना खरेदीची वेळ निश्चित करावी लागेल. विक्रेते खरेदीची तारीख, वेळ लघूसंदेशाद्वारे ग्राहकांना देतील. एका तासाच्या अवधीत फक्त ५० जणांना मद्य विक्री करता येईल. नोंदणीनुसार वितरण प्रक्रियेची माहिती विक्रेते ध्वनिक्षेपकावरून देतील. नोंदणी न करता अथवा दुसरीकडून आलेल्या संदेशावरून मद्य खरेदी करता येणार नाही. कारण, रांगेतील ग्राहकांचे भ्रमणध्वनी संदेश तपासले जाणार आहेत.
याआधी सुरू झालेली मद्य विक्री ग्राहकांची गर्दी, गोंधळ, खुंटीवर टांगले गेलेले नियम यामुळे अवघ्या काही तासांत बंद करावी लागली होती. शहरात शुक्रवारपासून ती नव्या नियमावलीद्वारे सुरू केली जात आहे. मद्य विक्री शांततेत, शिस्तबध्दपणे व्हावी यासाठी जिल्हा, पोलीस प्रशासनाने खास नियमावली तयार केली आहे. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक, ग्राहकांची मास्क तपासणी, सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर राहणार आहे. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून नियमावलीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी नमूद केले आहे.
या नियमानुसार प्रत्येक विक्रेत्याला भ्रमणध्वनी क्रमांक दुकानासमोर दर्शनी भागात लावावा लागेल. त्यावर ग्राहक लघूसंदेशाद्वारे मद्याची मागणी नोंदवतील. त्यावर विक्रेते मद्य खरेदीची वेळ, तारीख निश्चित करून देतील. दुकानांसमोर सहा फूट अंतर राखून चौकान किंवा वर्तुळाकार जागेत पाच ग्राहक उभे राहतील. विक्रेत्याने लघूसंदेशाची खात्री करून मद्य विक्री करावी. ग्राहकाने मास्क परिधान केला आहे किंवा नाही याची तपासणी होईल.
प्रत्येक तासाला ५० ग्राहकांन मद्य विक्री करता येईल. विक्री करतांना सॅनिेटायझर, हातमोजे, संरक्षक पोषाख यांचा वापर करावा, असेही सूचित करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मद्य विक्रेत्याला जबाबदार धरून संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी दिला आहे.
रांगेत ग्राहकांच्या लघूसंदेशाची तपासणी
मद्य विक्रेत्याच्या क्रमांकावर नोंदणी न करता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही. कारण, याबाबतच्या लघूसंदेशाची तपासणी केली जाणार आहे. विक्रेत्यांनी नेमलेले सुरक्षारक्षक आणि पोलीस रांगेतील ग्राहकांचे संदेश तपासणी करू शकतात. कोणत्याही फॉरवर्ड संदेशावर मद्य विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विक्रेत्यांनी दर १५ मिनिटांनी अथवा गरजेनुसार ध्वनिक्षेपकावरून मद्य वितरणाबाबत माहिती द्यावी.