नाशिक : समाजात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, इतिहासातील स्त्रीशक्तीचा जागर व्हावा, या हेतूने शिवजयंतीनिमित्ताने स्वराज्य सौदामिणी ताराराणी हा स्त्रीशक्तीला समर्पित सजीव देखावा, सामाजिक समरसतेवर आधारीत देखावा धुळे येथे विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा, कानुश्री प्रतिष्ठान आणि परीस ग्रुप यांनी संयुक्तपणे काढलेल्या शोभायात्रेत सादर करण्यात आला. यावेळी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात आली.
शिवजन्मोत्सवानिमित्त धुळे शहरात विविध संस्थांनी आणि संघटनांनी वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबविले. बुधवारी रात्रीपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली होती. सकाळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्यांनी आग्रारोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच शहरातून दुचाकी फेरी, शोभायात्रा काढून, रक्तदान करुन महाराजांना नमन केले.
विहिंप, नाट्य परिषद, कानुश्री प्रतिष्ठान आणि परीस ग्रुप यांनी सकाळी संयुक्तपणे शहरातील आग्रारोडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापासून शोभायात्रा काढली. त्यात विविध समाज प्रबोधनात्मक सजीव देखावे सादर करण्यात आले. आज समाजात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचाराविरोधात महिला, युवतींसह सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी स्वराज्य सौदामिणी ताराराणी हा स्त्री शक्तीला समर्पित देखावा सादर करण्यात आला. तसेच सामाजिक समरसता देखाव्यातून एकीचे बळ दाखविण्यात आले. यावेळी कलाकार नरेंद्र लाड, संतोष ताडे यांच्या भूमिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.