मालेगाव : शेतकऱ्यांकडील थकित कर्ज वसुलीसाठी थेट शेतजमीन लिलाव करण्याची नाशिक जिल्हा बँकेतर्फे राबविण्यात येणारी प्रक्रिया अत्यंत अमानुष असल्याची तक्रार भाजप किसान मोर्चातर्फे सहकार राज्यमंत्री मोरेश्वर सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. कर्ज वसुलीच्या पध्दतीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याने त्यास राज्य शासनाने अटकाव करावा, अशी मागणी मोर्चातर्फे करण्यात आली आहे.
किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहकार मंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा बँकेतर्फे अवलंबिण्यात येणाऱ्या कर्ज वसुली पध्दतीच्या विरोधात तक्रारीचा सूर लावला. तसेच या संदर्भात वस्तुस्थिती मांडणारे निवेदन सादर केले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे २०१३-२०१४ पासून सतत पडणारा ओला किंवा कोरडा दुष्काळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे शेती प्रयोजनासाठी घेतलेले बँकांचे कर्ज भरणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी थकबाकीदार झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> तोफखाना दलास लवकरच २६४० अग्निवीरांचे बळ; पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू
वसुलीसाठी नाशिक जिल्हा बँकेने ६० हजारावर कर्ज थकित शेतकऱ्यांच्या तारण दिलेल्या जमिनींची लिलाव प्रक्रिया आता सुरु केली आहे. स्थानिक विकास संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो. स्थानिक सहकारी संस्था व बँक शेतकऱ्यांची अडचण लक्षात न घेता वसुलीसाठी अमानुष पध्दतीचा अवलंब करत आहेत. तसेच सहकार विभागातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचे नाव लावण्यासाठी संरक्षण दिले जात आहे, याकडे शिष्टमंडळाने मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> नाशिक: मालेगावात गुंगीच्या गोळ्यांचा अवैध साठा हस्तगत – दोन जण ताब्यात
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर अवाजवी व्याज आकारणी झाली आहे. त्यामुळेदेखील अनेक शेतकऱ्यांकडील थकबाकीचा आकडा अधिक फुगल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असताना वसुलीसाठी जिल्हा बँकेद्वारा शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता कर्जवसुली आणि शेतजमीन लिलाव प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. शिष्टमंडळात खेमराज कोर, रंजित बागूल, रमेश पवार, सुधाकर पाटील, संजय सूर्यवंशी आदींचा समावेश होता.