नाशिक – अहिल्यादेवी होळकर पुलाजवळील रविवार पेठेतील प्राचीन श्री सुंदर नारायण मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम नऊ वर्ष उलटूनही पूर्ण झाले नसल्याने स्थानिक नागरिक एकवटले. त्यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात धडक देऊन जाब विचारला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही या विभागाला जाग आली नसल्याचा आरोप करत रखडलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.
हेही वाचा >>> प्रयोगशाळेपासून मैदान, सर्वांचीच वानवा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या
रविवार पेठ शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले. जीर्ण झालेल्या सुंदर नारायण मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामाला २०१६-१७ मध्ये सुरुवात झाली. तीन वर्षात ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रदीर्घ कालावधी लोटूनही ते अपूर्णच आहे. मंदिरातील मूर्ती अडगळीच्या ठिकाणी ठेवल्याने दरवर्षी होणारा हरिहर भेट उत्सव योग्यपणे साजरा करता येत नाही, भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागते, अशी तक्रार सचिन भोसले, सुरेश मारुंसह इतरांनी केली.
हेही वाचा >>> धुळ्यात चोरीस गेलेल्या २६ तोळे सोन्याचा मध्य प्रदेशातील जंगलात शोध
या मंदिराचे वैशिष्ठे म्हणजे या मंदिरापासून कपालेश्वर येथील ज्योत आणि पिंड यांचे दर्शन होते. दुरुस्ती कामामुळे तेही बंद झाले. संथपणे चाललेल्या कामात गुणवत्तेचाही अभाव असल्याने शासनाचा जिर्णोद्धाराचा मूळ उद्देश सफल होणार नाही. मंदिरातील घुमट हे पावसाळ्यात गळतात. नुतनीकरणाच्या कामाचा घुमट दुरुस्ती हा मुख्य उद्देश असताना घुमटाच्या कामास सुरुवातही झाली नसल्याकडे समितीने लक्ष वेधले. आठ वर्ष मंदिराची दुरुस्ती का रखडली, याची चौकशी करावी. प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
पुरातत्व विभागावर आक्षेप २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असताना पुरातत्व विभाग निद्राधीन असल्याचा आक्षेप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. पुरातत्व विभागाने वेगात काम करण्याची अपेक्षा केली जात आहे.