जळगाव – शरद पवार यांचे निष्ठावंत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयारी केल्यानंतर जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला आहे. जळगाव जिल्हा कार्यालयात पक्ष प्रवेश बंदीचे फलक लावत अनेकांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर देवकर यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे संबंधित पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री देवकर यांनी शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून आपली अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची तारीख ठरविण्यासाठीही त्यांनी तयारी केली आहे. देवकर हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे निष्ठावंत नेते असून, मराठा समाजातही त्यांचे चांगले वजन आहे. त्यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे शरद पवार गटासाठी मोठा हादरा मानला जात आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
जळगाव जिल्ह्यात जेमतेम एक आमदार असलेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देवकर यांचे स्वागत करण्याऐवजी उलट त्यांच्या पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. देवकर हे अजित पवार गटात सहभागी झाल्यानंतर पक्ष संघटनेला बळकटी येईल, असा विचार न करता देवकरांनी प्रवेश केल्यानंतर आपले पक्षातील महत्व कमी होईल, अशी भीती संबंधित पदाधिकाऱ्यांना आता वाटू लागली आहे.
हेही वाचा – भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच ज्ञानेश्वर पवार, श्यामकांत पाटील, शोभा पाटील, कैलास पाटील यांनी तर गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करताना त्यांच्या भूतकाळातील वर्तनावरच ताशेरे ओढले. २००९ च्या निवडणुकीत देवकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याला आमचा विरोध होता, पण पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून त्यांना संधी दिली गेली. प्रत्यक्षात देवकर यांनी पक्ष वाढविण्याऐवजी नंतर पक्षविरोधी काम केले. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला साथ दिली, असा आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.