नाशिक – एकमेकांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण सुरू असलेली जोरदार घोषणाबाजी… प्रत्येक फेरीगणिक कार्यकर्त्यांचा वाढणारा उत्साह…विजयावर शिक्कामोर्तब करणारे पक्ष ध्वज…गुलालाची उधळण, असे वातावरण मंगळवारी दिवसभर अंबड येथील मतमोजणी ठिकाण परिसराचे होते. विजयाचा जल्लोष साजरा करतांना कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या असतांना दुसऱ्या तंबुत मात्र कमालीची शांतता होती. प्रत्येक फेरी मागे पराभवाची पसरत चालेली गडद छाया, यामुळे कार्यकर्त्यांनी काढता घेतलेला पाय, असे संमिश्र वातावरण मतमोजणी केंद्रावर असलेल्या प्रत्येकाने अनुभवले.
हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024: दिंडोरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना धक्का; शरद पवार गटाची जोरदार मुसंडी
अंबड येथील औद्योगिक वसाहत परिसरातील वेअर हाऊस येथे मंगळवारी सकाळी नियोजित वेळेप्रमाणे मतमोजणीस सुरूवात झाली. कार्यकर्त्यांसह महाविकास तसेच महायुतीच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली. मतमोजणी केंद्रात मोजक्याच लोकांना प्रवेश असल्याने केंद्रापासून ठराविक अंतरावर कार्यकर्त्यांनी उभे राहत निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली. प्रत्येक क्षणाला कार्यकर्त्यांसह सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचत असतांना ध्वनीक्षेपकांवरून फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येत होता. दिंडोरी, सिन्नरसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महायुती तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र सुरूवातीपासून दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याने महायुतीच्या समर्थकांचा हिरमोड होत गेला. सिन्नरहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत विजयाचा जल्लोष साजरा केला. काहींनी गुलालाच्या गोण्या भरून आणल्या होत्या. महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी या वेळी फुगड्या घालत आनंद व्यक्त केला.
हेही वाचा >>> Dindori Lok Sabha Election Results : तिसरी पास बाबू भगरेंनी दिंडोरीत खऱ्या शिक्षकाच्या मताधिक्याला सुरुंग कसा लावला?
विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होत असतांना गर्दीत केवळ मशाल असलेले ध्वज हवेत उंचावले जात होते. कार्यकर्त्यांकडून प्रतिस्पध्यांचे खच्चीकरण करणाऱ्या घोषणा सातत्याने दिल्या गेल्या. काहींनी भाजप विरोधी घोषणाबाजी सुरू ठेवली. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम घालण्याचे काम यावेळी पोलीस करत होते. २० व्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित झाल्यावर महायुतीच्या तंबुत कमालीची शांतता राहिली. कार्यकर्त्यांसह, पदाधिकाऱ्यांनी तेथुन काढता पाय घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, कार्यकर्ते तसेच समर्थकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विजयोत्सवात सातत्याने गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजी सुरू होती.
कामगारांचे हाल
मतमोजणी केंद्रानजीक असणाऱ्या कंपन्यांमध्ये जाण्यासाठी कामगारांना दुचाकी लांबवर ठेवत दीड किलोमीटर पायपीट करावी लागली. काही कंपन्यांनी कामगारांची पायपीट टाळण्यासाठी कामगारांना सुट्टी दिली. ज्या कंपन्या सुरू होत्या, तेथील कामगारांना पर्यायी मार्गाचा अवलंब करत द्राविडी प्राणायाम करत कंपनी गाठावी लागली.