नाशिक : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे कामकाज आटोपल्यानंतर घरी परतत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा सोनवणे असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून याप्रकरणी तहसीलदारांकडून माहिती मागविण्यात आली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. देवळाली कॅम्प येथील एस.व्ही.के.टी. महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून  कृष्णा सोनवणे (४६) काम करतात.  त्र्यंबकेश्वर येथील नूतन त्र्यंबक इंग्लिश स्कूल केंद्रात मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने ते रविवारीच केंद्रावर दाखल झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रे सील करत जमा करण्याचे काम सुरू असतानाच त्यांना अचानक उलटी झाली.  त्यांनी ताबडतोब कुटुंबातील सदस्यांना कळविले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरापर्यंत मी येतो, तेथून पुढे मला घ्यायला या, असा निरोप त्यांनी दिला.

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पोहचल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेले असता  त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याने भोवळ आली. उपचारांसाठी त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. सोनवणे कुटुंबीयांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.