नाशिक : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा न झाल्याने आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपने जळगाव, रावेर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले असतानाही महाविकास आघाडीचे नेते अद्याप जागा वाटपाच्या फेऱ्यांमध्येच अडकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक मतदारसंघात ठाकरे गटाकडून प्रारंभी तत्कालीन जिल्हाप्रमुख तथा विद्यमान लोकसभा मतदारसंघ संघटक विजय करंजकर यांचे नाव उमेदवार म्हणून जितक्या झटकन पुढे आले होते, त्याच गतीने त्यांच्या नावाची चर्चा मागे पडली. महाविकास आघाडी सत्तेत असताना विधान परिषदेवर करंजकर यांची जाण्याची संधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे हुकली. शिवसेना दुभंगल्यानंतरही उध्दव ठाकरे यांना साथ देणाऱ्या करंजकर यांना त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून प्रारंभी पुढे करण्यात आले.

हेही वाचा…नाशिक : प्रौढ साक्षरता परीक्षेपासून स्थलांतरामुळे अनेक जण वंचित

नाशिक शहरातील काही बैठका, मेळाव्यांमध्ये खासदार संजय राऊत यांनीही त्यांची पाठराखण केली होती. परंतु, काही दिवसांपासून करंजकर यांच्या नावाविषयी पक्षातच शांतता आहे. अशातच ठाकरे गटाकडे उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी महापौर दशरथ पाटील, शांतिगिरी महाराज यांनीही प्रयत्न सुरु केले आहेत. सिन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नावही घेतले जात आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे इच्छुक असले तरी त्यांचा पक्ष अनिश्चित आहे.

महायुतीकडून या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी याआधीच जाहीर केली आहे. त्यास राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपकडूनही विरोध होत आहे. दिंडोरी मतदारसंघात विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भास्कर भगरे यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचे म्हटले होते. परंतु, त्यानंतर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा घोळ कमी की काय, माकपनेही मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

हेही वाचा…आचारसंहितेमुळे विद्रुपीकरणातून मुक्तता; २० हजारहून अधिक राजकीय फलक, भित्तीपत्रके, झेंडे हटवले

नाशिकजवळील धुळे मतदारसंघ महाविकास आघाडीतील जागा वाटपात काँग्रेससाठी सुटल्यात जमा आहे. या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मागील दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळी भामरे यांची उमेदवारी प्रबळ ठरेल काय, हे सांगता येणे अवघड असले तरी महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातही उमेदवारीचा घोळ सुरुच आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर या दोन नावांपुढे उमेदवारीची गाडी सरकताना दिसत नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराजवंतावरही काँग्रेसकडून गळ टाकला जाण्याची शक्यता आहे.

नंदुरबार मतदारसंघात स्थानिकांची पक्षातंर्गत असलेली नाराजी डावलून पुन्हा एकदा भाजपने विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर विश्वास ठेवला आहे. भारत जोडो न्याय यात्रा आणि नंदुरबारमधील राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला मिळालेला प्रतिसाद, यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह असला तरी त्यांच्याकडून उमेदवार जाहीर न करण्याचे कारण कोणालाच कळत नाही. काँग्रेसकडून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार ॲड. के. सी. पाडवी आणि नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघातही महाविकास आघाडीचे उमेदवारीबाबत घोंगडे भिजत आहे. रावेरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आधी उमेदवारीची घोषणा केली होती. परंतु, भाजपने त्यांच्या स्नुषा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जाहीर केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी थेट माघार घेतली. एवढेच नव्हे तर, त्यांची मुलगी रोहिणी खडसे याही उमेदवारी करणार नसल्याची घोषणा केल्याने खडसे विरुध्द खडसे लढत होण्याची अपेक्षा फोल ठरली. खडसे यांच्या या निर्णयावर शरद पवार गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही टीका होत आहे.

जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ, संतोष चोधरी यांचे नाव आता उमेदवारीसाठी पुढे येत आहे. दुसरीकडे, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्येही नाराजी आहे. उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील, त्यांची कन्या केतकी पाटील यांचीही निराशा झाली आहे. जळगाव मतदारसंघात ठाकरे गटही उमेदवाराच्या शोधात आहे. अलिकडेच पक्षात प्रवेश केलेल्या ललिता पाटील, पक्षाचे पदाधिकारी हर्षल माने यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ आहे. भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha schedulde announced yet maha vikas aghadi finding canditate in north maharshtra s six constituency psg
Show comments