महाविद्यालयांमध्ये तालमींना जोर, माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सहभाग

सध्या शहरासह जिल्ह्य़ातील महाविद्यालयांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा रंग चढू लागला असून आजी-माजी विद्यार्थ्यांचा चमू रंगीत तालमींमध्ये व्यस्त झाला आहे. माजी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या सूचना स्पर्धेत सहभागी असलेल्यांना मदतीला येत असून त्यामुळे त्यांच्या तालमी अधिकच काटेकोरपणे होत आहेत. तालीम छान झाली की दिग्दर्शक, लेखकांकडून चहाची भेट, अशा खेळीमेळीच्या वातावरणात कलाप्रेमी विद्यार्थ्यांकडून रंगमंचाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला जात आहे.

शैक्षणिक वर्षांच्या आरंभासह ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत यंदा काय करायचे, याची चर्चा महाविद्यालयांच्या कट्टय़ावर रंगण्यास सुरुवात होते. दिवाळीच्या सुटीत कलामंडळातील विद्यार्थी तसेच नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांकडून नवीन काय करता येईल, याविषयी विचारणा सुरू होते. महाविद्यालयाची एखादी खोली किंवा सभागृह लोकांकिकेच्या तालमीचे ठिकाण होऊन जाते. वेळेचे भान न राहता मुले तालमीत दंग होऊन जातात. याविषयी न. ब. ठाकूर विधि महाविद्यालयाची सिद्धी भावसारने मनोगत मांडले. सध्या तासिकेच्या वेळा सांभाळून सराव सुरू आहे. महाविद्यालयात सकाळी सात वाजता आणि तासिका संपल्यानंतर लोकांकिकेचा सराव सुरू होतो. सरावात वेळ किती झाला हे लक्षातच येत नाही. यामुळे घरी जायला कधी कधी उशीर होतो. पालकांचा ओरडा बसत असला तरी चांगल्या कामासाठी मुले थांबली हे ते समजून घेतात. सराव करताना बऱ्याचदा भूक लागते. त्या वेळी ‘टीटीएमएम’ तर कधी सर्वाचा हातभार लागून जवळच्या कॅफेवाल्याकडून पार्सल मागवीत भूक शमविली जाते. काही वेळा तालमी छान झाल्या तर लेखक, दिग्दर्शकच चहा किंवा अन्य काही मागवून घेतात. अशा खेळीमेळीच्या वातावरणात सराव सुरू असल्याचे तिने सांगितले.

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या ॠषीकेश जाधवने एका वेगळ्याच जोशात एकांकिका बसविणे सुरू असल्याचे सांगितले. नाटक किंवा एकांकिका काय हे कोणालाच माहिती नाही. जुनी माणसे सांगतील, त्या पद्धतीने आमचा सराव सुरू आहे. संपूर्ण चमू नवा तर तांत्रिक बाबींसाठी माजी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याकडून सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले.

हं. प्रा. ठा. महाविद्यालयाच्या रेणुका येवलेकर, महिमा ठोंबरे यांनीही आपला अनुभव मांडला. पाच वर्षांपासून लोकांकिकेत आम्ही सहभागी होत आहोत. तो दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असताना यंदा संपूर्ण संघ नवा आहे. त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असताना अभिनय, तांत्रिक गोष्टी याविषयी ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे बऱ्याचदा काही वाद होतात, पण तो तात्त्विक वाद असून यामुळे तालमीत कुठलाच अडथळा येत नाही. नव्या मुलांकडून वेगवेगळ्या कल्पना येत आहेत. यातून काम करण्यात खूप मजा येत असल्याचे रेणुकाने नमूद केले. महाविद्यालयातच आमच्या तालमी दिवसभर सुरू असून प्राध्यापक आणि अन्य विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

Story img Loader