प्राथमिक फेरीत नवरंगकर्मीची भावना
‘लोकसत्ता लोकांकिका’ नवरंगकर्मीसाठी व्यासपीठ सोबत मार्गदर्शनाच्या दृष्टीने ‘विद्यापीठ’ आहे. संहितालेखनापासून एकांकिकेतील वेगवेगळ्या तंत्रांतील बारीक चुका, संवादातील पंच याबाबत मार्गदर्शकांकडून होणारे मार्गदर्शन कलावंत म्हणून मोलाचे ठरते, अशी प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केली. नवरंगकर्मीना त्यांच्यातील ऊर्जा, दिशा देण्याचे काम ‘लोकांकिका’ स्पर्धा करीत असल्याची भावना परीक्षकांनी व्यक्त केली.
येथील कुसुमाग्रज स्मारकात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय प्राथमिक फेरीला शुक्रवारी सुरुवात झाली. या वेळी परीक्षकांसह आयरिस प्रॉडक्शनचे समन्वयक उपस्थित होते.
आपली एकांकिका संपल्यावर परीक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी कलाकार उत्सुक होते. काही ठिकाणी परीक्षकांनी रंगकर्मीचा वर्ग घेत त्यांना सादरीकरणातील बारकावे समजावून सांगितले.
शाहीर असल्यामुळे त्रास झाला नाही
‘लंगर’चे दिग्दर्शक प्रा. प्रवीण जाधव यांनी स्वत: शाहीर असल्यामुळे दिग्दर्शन करताना फारसा काही त्रास झाला नसल्याचे सांगितले. मुले तयारी करत असताना काही चुका करायची. त्यामुळे कधी कधी थोडी चीडचीड व्हायची. लेखनाव्यतिरिक्त संहितेत अनेक ठिकाणी पंच टाकत संहिता उठावदार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत परीक्षकांनी केलेल्या सूचना लक्षात राहण्यासारख्या असल्याचे सांगितले. स्नेहा सूर्यवंशीने सध्या परीक्षा सुरू असतानाही एकांकिकेची आवड असल्याने वेळ काढत सराव केल्याचे नमूद केले. या पात्राची तयारी करतांना ‘फॉरिनची पाटलीन’ चित्रपट पाहत त्याचे काही बारकावे टिपल्याचे सांगितले. परीक्षकांनी अभिनय छान केला ही दिलेली दाद माझ्यासाठी कुठल्याही पारितोषिकापेक्षा महत्त्वाची असल्याचा अभिमान तिने व्यक्त केला.
सादरीकरणाची जुनी पद्धत मोडण्याचा प्रयत्न
हं. प्रा. ठा.च्या ‘चलो सफर करे’ची दिग्दर्शक आर्या शिंगणे हिने मुळात एकांकिका ‘रियालेस्टिक’ नाही. जे काही घडते ते सर्व काल्पनिक असल्याचे सांगितले. एकांकिकेची सुरुवातच वेगळी असल्याने आम्ही सर्व उत्साही होतो. ज्या गोष्टी घडून घेल्या आहेत, त्या पुन्हा नको दिसायला असा आमचा प्रयत्न होता. सादरीकरणाची जी जुनी पद्धत आहे, ती मोडण्याचा आमचा प्रयत्न होता, असे त्यांनी सांगितले. कल्पेशने ‘मुंबईकर’ अशी ५५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका पहिल्यांदा मिळाली आणि खूप कमी दिवसात अगदी नऊ दिवसांतच ती साकारल्याचा आनंद व्यक्त केला. ही भूमिका साकारताना मी माझ्या बाबांना पाहिले. आणि अगदी त्यांनाच इथे उभे केले. फक्त स्वभाव बदलल्याचे कल्पेशने सांगितले. संगीताची बाजू सांभाळणाऱ्या संयुक्ता परचुरे हिने एकांकिकेतील शेतकरी हा वारकरी असून एकांकिकेत दोन अभंग होते म्हणून जिथे रहस्य संपते, तिथे आम्ही टाळ वाजवत होतो, घुंगरू, तबला यांचापण आम्ही वापर केल्याचे सांगितले. ध्वनिमुद्रितपेक्षा जिवंत संगीतामुळे वेगळा आयाम लाभल्याचे परचुरेने नमूद केले.
संगीत आणि तांत्रिक अडचणींवर मात
भि. य. क्ष. महाविद्यालयाच्या ‘तुकाराम डाऊनलोडिंग’चा दिग्दर्शक कृतार्थ कन्सारा याने एकांकिकेची तयारी करताना अडचणी येत गेल्याचे मान्य केले. सर्व कलाकार नवीन आहेत. त्यांच्यावर रागावलो तरी व्यवस्थित काम करतात. संगीतसह अन्य काही तांत्रिक अडचणींवर मात करत काम करण्यात आल्याचे सांगितले. श्रीरंगने महाविद्यालय आणि अभ्यास यातून नाटकाच्या तयारीला वेळ काढणे कठीण जात होते, असे नमूद केले. नाटकाचा विषय नवीन असल्याने काम करायला मजा आली. आमचा सराव सुरू असताना आमच्याकडून खूप चुका होत होत्या, पण दिग्दर्शक म्हणून कृतार्थ कधी रागावला नाही. बोट धरून त्याने आम्हाला बारकावे लक्षात आणून दिल्याचे श्रीरंगने सांगितले.
नाटय़ चळवळ ग्रामीण भागांत नसल्याची खंत
लासलगाव महाविद्यालयाचे दिग्दर्शक प्रा. विजय भालेराव यांनी नाटय़ चळवळ अद्याप ग्रामीण भागात रुजलेली नसल्याचे दु:ख मांडले. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘नाटक बसत आहे’ ही एकांकिका बसविण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले. लेखक दिलीप शेटे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘पद्मिनी’ चित्रपट आला आणि त्याच्या सेटवर जाऊन जी जाळपोळ करण्यात आली या घटनेतूनच एकांकिकेचे बीज सापडल्याचे नमूद केले. ‘लोकांकिका’ने ही संधी दिल्याने एक नवा विषय मांडता आला याचा आनंद आहे. परीक्षेमुळे आम्हाला आमच्या भूमिकेचा अभ्यास करण्यास वेळ देता आला नाही, अशी खंत पल्लवीने व्यक्त केली.
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.