‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’विभागीय प्राथमिक फेरी

नाशिक : दै. लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पर्धेची विभागीय प्राथमिक फेरी येथील कुसुमाग्रज स्मारकात स्पर्धकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने रंगली. बहुतांश स्पर्धकांनी ‘मी -टू पणाची बोळवण’ या विषयावर गंभीरपणे मांडणी केली. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी महाविद्यालयीन युवक किती जागरूक आहे, त्याविषयी त्यांची विचार करण्याची पध्दत, ते मांडतांना ठेवण्यात येणारे तारतम्य, हे सर्व काही या स्पर्धेत दिसून आले. परीक्षकांनीही त्यांच्या अभ्यासाचे कौतुक केले.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीत सहभाग घेतला. स्पर्धेसाठी ‘मी -टू पणाची बोळवण’, ‘क्लोनिंग-माकडानंतर माणूस’,‘ चरित्रपटांचे चारित्र्य, ‘खेळ की नायक’ हे प्राथमिक फेरीचे विषय देण्यात आले होते.

बहुतांश स्पर्धकांनी मी-टू पणाची बोळवण या विषयावर मत व्यक्त केले. वृत्तपत्रीय वाचन, इंटरनेट तसेच अन्य संदर्भातून विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहचणे गरजेचे असतांना काहींनी इतर विषयांना केवळ स्पर्श केला. बोटावर मोजण्याइतक्या स्पर्धकांनी अतिशय उत्तम पध्दतीने विषयाची मांडणी करत त्या त्या विषयाला न्याय दिल्याचे मत परीक्षकांनी मांडले. मी-टू पणाची बोळवण हा विषय मांडतांना स्पर्धकांनी  मी टू चळवळीचा इतिहास, त्याची गरज, फलश्रृती याकडे लक्ष वेधले.

लिंगभेदापलिकडे जात सामाजिक सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी सुरू झालेली चळवळ सध्या विखुरली आहे. तिची बोळवण करायची असेल तर महिला सुरक्षिततेच्या कायद्यांची प्रभावीपणे अमलबजावणी गरजेची आहे. स्त्रियांनी त्यांच्या प्रतिमेतून बाहेर पडत अन्यायाविरूध्द आवाज उठवत कायदेशीर कारवाईत सहभाग घेणे अपेक्षित आहे. ही चळवळ सामाजिक माध्यमांपुरता मर्यादित न राहता तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याची व्याप्ती, पाठपुरावा, साध्य की साधन या प्रश्नांची उत्तरे सापडली की या चळवळीची ‘बोळवण’ होईल, अशी अपेक्षा स्पर्धकांनी व्यक्त केली.

चरित्रपटांचे चारित्र्य विषयही अनेक स्पर्धकांनी मांडला. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक पातळीवर चारित्र्यासाठी लावले जाणारे निकष चरित्रपटांसाठी लावले जावे. प्रतिमा आणि प्रतिभा यांचा विचार करत मंडण आणि खंडण या दोन्हीचा प्रेक्षकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिग्दर्शक आर्थिक गणित लक्षात घेऊन चित्रपट

काढतो. त्याच्याकडून सामाजिक संदेशाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. परंतु, चरित्रपटातील कुठले विचार मूल्य निवडावे हे प्रेक्षकांच्या हाती आहे. सध्या चरित्रपटातून रंजनाचा इतिहास दाखवत मनोरंजन करतांना वास्तवाकडे पाठ फिरवली जात आहे. असे असतांना प्रादेशिक स्तरावर अशा चित्रपटांच्या माध्यमातून नवी उमेद जागविली जात असल्याचा विश्वास स्पर्धकांनी व्यक्त केला.

‘क्लोनिंग-माकडानंतर माणूस’ विषयावर बोटावर मोजण्या इतक्या स्पर्धकांनी आपले विचार मांडले. क्लोनिंगची गरज काय, ते केल्याने जगण्याचे तंत्र हरवून जाईल. क्लोनिंग जर झाले तर संस्कृती, मानव आणि यंत्र यातील फरक राहणार नाही. तंत्रज्ञानाचा अवलंब करतांना माणुसपण हरवता कामा नये, असा विचार स्पर्धकांनी मांडला. ‘खेळ की नायक’ हा विषय स्पर्धकांना समजला नसल्याचे परखड मत परीक्षकांनी मांडले.

स्पर्धकांचे शंका समाधान

प्राथमिक फेरीत सादरीकरणा संदर्भात विद्यार्थ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. वक्तृत्व कला कशी विकसीत होईल, या प्रश्नाचे परीक्षकांकडून समाधान करण्यात आले. आशय आणि अभिव्यक्ती यातील प्रवास म्हणजे वक्तृत्व कला आहे. ही कला सरावाने उपजत होते. सातत्याने स्पर्धेत सहभाग घेत, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चर्चा करीत त्या त्या विषयाची माहिती घेत टिपण काढणे गरजेचे आहे. आशय मांडता आला की स्वतची अशी शैली विकसीत होत जाते. चांगला श्रोता हा उत्तम वक्ता होऊ शकतो, असे सांगण्यात आले. शुध्द मराठीचा आग्रह धरला जात असतांना ग्रामीण भागातून येणाऱ्या स्पर्धकांचे काय, याविषयी  स्पर्धेत ग्रामीण किंवा शहरी असा फरक नसतोच, असे परीक्षकांनी स्पष्ट केले. स्पर्धक मुद्दे मांडतांना कमी पडतो. त्याचे मुद्दे योग्य पध्दतीने मांडले गेले तर त्याला आव्हान देता येणार नाही. सादरीकरणात बोली भाषेचा वापर बऱ्याचदा होतो. भाषेच्या संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या छटा आहेत. त्या त्या भागाचा गोडवा त्यात रुजल्याने स्पर्धक आपल्याच भाषेत व्यक्त होणार हे परीक्षकांनाही माहिती आहे. परिस्थितीनुरूप स्पर्धकालाही बोलता आले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

प्रायोजक

‘पिंताबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व’स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविवार, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

Story img Loader