‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ वक्तृत्व स्पर्धेची नाशिक विभागीय प्राथमिक फेरी उत्साहात; वक्त्यांकडून विषयांवर हिरीरीने मते व्यक्त
आजची युवा पिढी वाचते काय, या गैरसमजाला छेद देत विविध विषयांवर वक्त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ वक्तृत्व स्पर्धेची नाशिक विभागीय प्राथमिक फेरी गाजवली.
शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतीक राजकारणात ठळकपणे जाणवणारी ‘नमो निती’ ते घराच्या उंबऱ्यापर्यंत आलेला दहशतवाद, अशा विविध विषयांवर मत मांडत वक्त्यांनी वाचन, अभ्यास आणि आपल्या वक्तृत्व शैलीचा प्रत्यय दिला. परीक्षकांच्या मौलिक सूचना पुढील वाटचालीत मार्गदर्शक ठरतील अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त केली.
येथील कुसुमाग्रज स्मारकातील श्रावण आणि स्वगत या सभागृहात मंगळवारी लोकसत्ता ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ची प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेली ही स्पर्धा ‘सिंहगड इन्स्टिटय़ुट’, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑईल’ यांच्या सहकार्याने होत आहे. ‘युनिक अकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ६२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यंदा स्पर्धेसाठी मला कळलेली नमो नीती, धर्म आणि दहशतवाद, बीईंग ‘सेल्फीश’, वर्तमानातला इतिहास आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते? हे विषय देण्यात आले होते. मागील वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘नमोनीती’ हा शब्द समाज माध्यमातून ठळकपणे अधोरेखीत करण्यात आला.
एका राजकीय पक्षाला व्यक्तीचा चेहरा देऊन निवडणुका यशस्वी झाल्या. पहिल्या वर्षांत जागतीक स्तरावर शेजारील राष्ट्राशी करार करत अनेकांनी मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करणारे मोदी यांना एक वलय प्राप्त झाले. या वलयाचा सर्वसामान्य जनतेवर झालेला परिणाम, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विश्वात त्याचे उमटणारे पडसाद यावर ‘नमोनीती’ या विषयातून स्पर्धकांनी लक्ष वेधले.
दहशतवाद या विषयावर बोलताना तरुणाईमधील देशभक्तीही विशेष खुलल्याचे दिसून आले. धर्म आणि दहशतवाद एकमेकांना पूरक असून त्यांना वेगळे करता येणे शक्य नसल्याचे मत काही जणांनी मांडले. दहशतवाद कोणा एका विशिष्ट धर्मामुळे फोफावला असे ठामपणे म्हणता येणार नाही. एकाच धर्माचे गुणगाण गाणे व त्यासाठी इतरांवर दबाव आणणे हा ही एक दहशतवाद असल्याचे मत काहींनी मांडले. दहशतवाद हा रक्तरंजीत असतो असे नाही, तर तो रक्तविरहीतही असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले. आजकाल ही संकल्पना राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी ठरत असून दिवसागणिक त्याचे स्वरूप केवळ बदलत आहे. त्याचे जागतिकीकरण होत असतांना स्थानिक पातळीवर याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे काही जणांनी स्पष्ट केले.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते? विषय मांडणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक होती. एकीकडे महिलांचे सक्षमीकरण तर दुसरीकडे तिच्यावर होणारा अत्याचार, तिचे विविध माध्यमातून होणारे शोषण, स्त्रीशक्तीचा जागर होत असतांना विविध पातळीवर होणारी अवहेलना याकडे अनेकांनी लक्ष वेधले. सेल्फीत अडकलेल्या युवा वर्गाला ‘बीईंग सेल्फीश’ विषयाचा विसर पडला.
स्पर्धा समारोपात परीक्षकांनी स्पर्धेविषयी काही निरीक्षणे नोंदवित स्पर्धकांच्या चुकांवर मार्मिक भाष्य केले. स्पर्धकांनी शब्दोच्चार, देहबोली, आवाजातील चढउतार याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी परीक्षक सौ. नेहा सोमठाणकर यांनी स्पर्धकांनी आपल्या संहितेत कोट घेतांना खरंच त्याची गरज आहे का याचा विचार करावा तसेच त्याची चिरफाड न करता तशीच्या तशी ती उचलण्यात यावी. विशेषण आणि नाम यातही मुलांची गल्लत होत असल्याचे सांगितले; परंतु त्यांचा प्रयत्न चांगला असल्याचे त्या म्हणाल्या.
अवांतर वाचनाची गरज
तळमळीने बोलणारे वक्ते ऐकायला मिळाले. पण विषयाला न्याय देण्यासाठी सखोल वाचन करून स्वतची संहिता काढून बोलणारे मोजकेच आढळले. अवांतर वाचन वाढवल्यास वक्तृत्व कौशल्य नक्कीच सुधारता येईल. लोकसत्ताने स्पर्धकांना अप्रतिम विषय दिलेत. ‘इतिहासातील वर्तमान’ या विषयावर एकही वक्ता बोलला नाही. आजची पिढी ‘बिंग सेल्फीश’ या विषयाला न्याय देऊ शकली नाही.
– वैशाली शेंडे, परीक्षक
कार्यशाळेची गरज
लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून खंडित झालेली परंपरा या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ‘दशसहस्त्रेषु’ होण्यासाठी अद्याप अभ्यास, वाचन याची गरज आहे. यासाठी प्राथमिक फेरीआधी वक्तृत्व कार्यशाळा होणे गरजेचे आहे. यातून स्पर्धकास काही सूचना, मार्गदर्शन मिळु शकेल. भाषा, वाचन, उच्चार यावर मेहनत घेणे गरजेचे आहे.अनेकांनी इंग्रजी, हिंदी शब्दांवर भर दिला.
-प्रा. गिरीश पिंपळे, परीक्षक
लोकसत्ताचा उपक्रम स्तुत्य आहे. आजकाल मुले वाचत नाही हा गैरसमज स्पर्धेमुळे दूर झाला. केवळ संगणकावर उपलब्ध होणाऱ्या माहितीपेक्षा संदर्भ साहित्य, अवांतर वाचन यावर मुलांनी भर दिला आहे. जागतीक स्तरावर चर्चेत असलेल्या महिलांवरील अत्याचार व दहशतवाद याकडे मुलांनी लक्ष वेधले. विषयाची तयारी उत्कृष्ट होती. चांगली व्यक्ती म्हणून घडतांना त्यांना पुढील जीवनात या विचारांचा उपयोग होईल.
अपर्णा क्षेमकल्याणी (परीक्षक)