‘सांगा आम्हाला बिर्ला टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा आमचा कुठाय हो, घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतेच घेऊन पळे , धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?’
सत्ताधाऱ्यांना आणि प्रस्थापित समाजाला आपल्या लेखणीतून जाब विचारणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची मौलिक साहित्यसंपदा अधिकाधिक जणांपर्यंत पोहचावी, यासाठी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापलेल्या लोकशाहीर वामनदादा कर्डक अध्यासनाच्या काही उपक्रमांना निधीअभावी कात्री लागली आहे. अध्यासनाने अलीकडेच दृष्टिबाधितांसाठी नॅब कार्यालयात अध्ययन केंद्र सुरू केले. विद्यापीठाचा परीघ ओलांडत काम करण्याचा विचार करणाऱ्या अध्यासनाला शासकीय निकषामुळे आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. परिणामी, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर कार्यक्रम निश्चित करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
मुक्त विद्यापीठाने वामनदादांच्या जयंतीनिमित्त १५ ऑगस्ट २०१२ रोजी लोकशाहीर वामनदादा कर्डक अध्यासनाची स्थापना केली. विद्यापीठाच्या नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी यासह राज्यातील आठ केंद्रांमार्फत इच्छुकांना अध्यासनाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली. वंचित, शोषित यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या लोकशाहीर वामनदादा यांची गीते, साहित्यसंपदा सर्वाना खुली व्हावी, हा या अध्यासन स्थापनेचा मूळ उद्देश. मात्र स्थापनेपासून अध्यासनाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वामनदादांचे साहित्य विपुल प्रमाणात असले तरी ते मौखिक स्वरूपात आहे. त्यांच्या चाहत्यांनी ही संपदा शब्दबद्ध करत साहित्य प्रकाशित करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. त्यामुळे अध्यासनाकडे केवळ महाकवी वामनदादा कर्डक समग्र वाङ्मय खंड १ ते ८ यासह काही निवडक अशी १२ पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या सर्व केंद्रांवर ती उपलब्ध करून दिली गेली.
अध्यासनास साजेशी रचना तीन वर्षांत विद्यापीठ करू शकलेले नाही. विद्यापीठ आवारातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या एका खोलीतील ग्रंथालयाशेजारील मोकळ्या भागात लोकशाहीर कर्डक अध्यासन सुरू आहे. या ठिकाणी अध्यासनाची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक नाही. अध्यासन प्रमुखाची जबाबदारी प्रभारी स्वरूपात आहे. अध्यासनाने स्थापनेपासून परिघ विस्तारण्याचा प्रयत्न केला. त्याअंतर्गत वामनदादांच्या २०० लोकगीतांना शास्त्रीय संगीतावर चाल देत ‘रंगला भूमीचा नवा नूर’ हा कार्यक्रम विविध केंद्रांवर घेण्यात आला. वामन दादांनी आयुष्यभर समता-लोकशाही आणि प्रबोधनांवर काम केले. या त्रिसूत्रीची महती विद्यार्थ्यांना कळावी यासाठी केंद्राकडून प्रयत्न झाले. तसेच सुगंधी फूल शेती, वनस्पती, आयुर्वेदीय वनस्पती यांची शेती करणाऱ्या बचत गटांना बारामतीच्या कृषी विद्यापीठात अभ्यासभेट घडवून आणली. जेणेकरून त्यांना आपल्या शेतीत नवे प्रयोग करता येतील. मात्र केंद्राचा हा उपक्रम आर्थिक मुद्दय़ावर रेंगाळला. अलीकडेच दृष्टिबाधितांना वामनदादांचे साहित्य समजावे यासाठी येथील नॅबच्या कार्यालयात अद्ययावत अशी यंत्रणा बसवत अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लाभ १५-२० विद्यार्थी घेत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात अद्याप वामनदादांविषयी अनास्था दिसत असून एकाचा अपवाद वगळता अद्याप कोणी विद्यार्थ्यांने वामनदादांच्या साहित्याची ‘पीएच.डी.’साठी निवड केलेली नाही.
वामनदादांच्या साहित्याची शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी अध्यासन केंद्राला निबंध लेखनासह अन्य स्पर्धा घेण्याची इच्छा आहे. मात्र शासन आणि विद्यापीठाच्या निकषामुळे पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना कात्री लावणे भाग पडले. अध्यासनाचे काम सुरळीत चालावे यासाठी सुविधांचा अभाव या ठिकाणी असल्याने अभ्यासक अभ्यास तरी कसा करणार, हा प्रश्न आहे.
तीन वर्षांत एकच लाख
लोकशाहीर वामनदादा कर्डक अध्यासनाच्या स्थापनेपासून निधी उपलब्ध नव्हता. अन्य शासकीय विभागातून अध्यासनाचा खर्च भागविला जात होता. अध्यासनाचा साधारणत: दोन ते पाच लाख वार्षिक खर्च आहे. २०१४-१५ वर्षांसाठी कुलगुरूंनी विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात एक लाख रुपयांची तरतूद केली. मात्र ही तरतूदही तुटपुंजी आहे.
– विजयकुमार पाईकराव
(प्रमुख, लोकशाहीर वामनदादा कर्डक अध्यासन)