चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथे कापूस खरेदीवेळी मापात क्विंटलमागे ३० ते ३५ किलोचा घोळ धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील व्यापार्याकडून केला जात असल्याचा प्रकार आ. मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला.लोंजे येथील शेतकरी मुन्ना चव्हाण यांनी ४० क्विंटल कापूस वेचणीवेळी मोजून घरात ठेवला होता. गावात आलेल्या धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील व्यापार्याने तो कापूस प्रतिक्विंटल सात हजार ८०० रुपये भावाने खरेदी केला. मात्र, ४० क्विंटल कापसाचे वजन केवळ ३० क्विंटल भरले. संबंधित व्यापार्याने मोजलेल्या मालाची रक्कमही शेतकर्याला तत्काळ दिली. मात्र, १० क्विंटल घट आल्याने, ही बाब शेतकरी चव्हाण यांनी सरपंचांसह इतर शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी संबंधित व्यापार्याला याचा जाब विचारला. संबंधित प्रकाराची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. आमदार चव्हाण यांनीही तत्काळ संबंधित ठिकाणी येऊन पाहणी केली. मात्र, तोपर्यंत संबंधित व्यापारी निघून गेला होता.
हेही वाचा >>>श्रीराम नवमी रथयात्रा मार्गातील अडथळे दूर करण्याची सूचना, पोलिसांकडून मार्गाची पाहणी
आमदार चव्हाण यांनी ४० किलोमागे १० ते १२ किलो कापूस म्हणजे एका क्विंटलमागे ३० ते ३५ किलो अधिक मोजला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. आमदारांनी शेतकर्यांसोबत तो मोजलेला कापूस, मालमोटार असा मुद्देमाल घेत चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षकांना गंभीर प्रकाराच्या अनुषंगाने शेतकर्यांची तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. शेतकर्यांच्या तक्रारी स्वतंत्रपणे दाखल करून घेत त्यांना न्याय मिळवून द्यावा, दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना आमदार चव्हाण यांनी पोलीस निरीक्षकांना केली.
हेही वाचा >>>जळगावात तरुणाचा खून, दोघांना अटक
लुटणार्यांना सोडणार नाही- आमदार चव्हाण
आमदार चव्हाण यांनी हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. कापूस घरात पडून राहिल्याने हवालदिल झालेले शेतकरी दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून कापूस बाहेरच्या जिल्ह्यातील अनोळखी व्यापार्यांना विकतात. हा केवळ एका व्यापार्याचा किंवा एका शेतकर्याचा विषय नाही. काटा मारलेला कापूस मोजण्यासाठी आदिवासी समाजातील मजुरांना कामावर घेतले जाते. कापूस भरण्यात येत असलेली मालमोटारही भंगार स्वरूपातील वापरली जाते. यात काही जिनिंगचालकही सहभागी असल्याचा आरोप करीत आमदार चव्हाण यांनी, शेतकर्यांना लुटणार्या संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. यात कितीही मोठा व्यापारी अथवा व्यक्ती असला तरी शेतकर्यांना लुटणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकर्यांनीही विश्वासातील व्यापार्यांनाच माल विकावा व कापूस मोजताना ताणकाट्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स काटा वापरण्याचा आग्रह धरावा, असे आवाहनही आमदार चव्हाण यांनी केले.