निवडणूक काळात बँकांनी आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील साठविणे आवश्यक असून संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात  निवडणूक खर्चाबाबतच्या आढावा बैठकीक दिली.

एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे, असे मांढरे यांनी सांगितले.

निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम यंत्रात रोकड जमा करतांना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा.  तसेच खासगी विमान, हेलिकॉप्टर यांची सेवा पुरवितांना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्तीकर विभागाने या प्रकरणी तात्काळ प्रतिसाद यंत्रणा निर्माण केली आहे.  रोकड रकमेच्या वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांबाबत रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन सूचनांची कटाक्षाने अंमलबजावणी करावी.

निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे, उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्या संदर्भात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचना मांढरे यांनी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, प्राप्तिकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, उपायुक्त आयकर मनोज सिन्हा, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंग राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी.व्ही. बर्वे आदी उपस्थित होते.