नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मातोरी गावाजवळील सुळा डोंगर आणि रामशेज किल्ल्याच्या माथ्यावर उत्तरेस गुरूवारी दुपारी वणवा लागला. या वणव्यात जैवसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच वनविभाग तसेच पर्यावरण मित्रांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग नियंत्रणात आणत असतांना पर्यावरण संरक्षकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा- महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे आजपासून कार्यक्रम – गर्भगृह दर्शन बंद
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने डोंगराळ परिसरात वणवेही लागू लागले आहेत. एका आठवड्यात हरसूल, मातोरी गायरान येथे वणवा लागला. गुरुवारी मातोरीजवळील सुळा डोंगर आणि पेठ रोडवरील रामशेजच्या माथ्यावरून धूर निघू लागल्यावर शिवाजी धोंडगे, तुषार पिंगळे यांनी वन विभागास माहिती दिली. तत्पूर्वी भारत पिंगळे, शिवाजी पिंगळे, लक्ष्मण लोखंडे, नामदेव लोखंडे वन विभागाचे ओमकार देशपांडे आदींनी प्रयत्नांची शिकस्त करून सुळा वनक्षेत्रातील वणवा आटोक्यात आणला. दुपारच्या सत्रात रामशेजची आग वनविभागाचे स्थानिक वनरक्षकांसह इतरांनी विझवली. धोंडगे यांना आग विझवितांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा- धुळे महापालिकेतर्फे दंडमाफी योजनेला मुदतवाढ
दुर्गभक्त आणि वनविभागाने मोठ्या कष्टाने हे दोन्ही वणवे विझवले. या दोन्ही ठिकाणी कायमच वणवा लागत आहे. वणवा आपोआप लागत नसून समाजकंटक आग लावत असल्याचा संशय आहे. याबाबतीत स्थानिक वनव्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायती यांनी रीतसर तक्रारी दाखल कराव्या. वन विभागाने याबाबतीत गांभीर्याने घेऊन वणवा लागण्याच्या कारणांचा शोध लावावा, वन व्यवस्थापन समित्यांना वणवा विझविण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी शिवकार्य गडकोट संस्था, दरी माता पर्यावरण, वृक्षवल्ली फाउंडेशनने केली आहे.
हेही वाचा- जळगाव : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी स्थानबद्ध
वणवा विझविण्यासाठी राबणाऱ्या मंडळींना कुठलेही साधन, साहित्य दिले जात नाही. गावागावात वन समित्या गठीत आहेत. कागदोपत्री असलेल्या या वन समित्यांना वणवा विझविण्याचे प्रशिक्षण कधी मिळणार ?, सातत्याने वणवा लागणारी ठिकाणे लक्षात घेऊन तिथे वणवा लावणारे कोण, याचा शोध घ्यावा. याबाबतीत स्थानिक ग्रामपंचायतींनी सक्रिय होणे आवश्यक आहे. अशी माहिती दुर्गप्रेमी राम खुर्दळ यांनी दिली.