नाशिक – सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा-बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेत मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे शिक्षक नसल्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
शैक्षणिक वर्ष चालू होऊन सात महिने झाले असतानाही अद्याप इंग्रजी, इतिहास या विषयांना शिक्षक मिळालेले नाहीत. मराठी विषय शिकविण्यासाठी मुख्याध्यापकांनी स्वतः पुढाकार घेतला असला तरी सात महिन्यात त्यांनी मराठीचा एकच पाठ शिकवला आहे. बेडसे, अंबुपाडा, आंबोडे, खोकरविहीर, झगडपाडा, केळावण या गावातील पालक, ग्रामस्थ यांनी आश्रमशाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण, दहावीची परीक्षा दोन महिन्यांवर आली असताना विद्यार्थी परीक्षेत उत्तरपत्रिकेत काय लिहिणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक नुकसानीमुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही चिंतेत आहेत. मुख्याध्यापक वेळेवर शाळेवर हजर राहत नाहीत, ही पालकांसह ग्रामस्थांची तक्रार आहे.
हेही वाचा – मास उपक्रमांतर्गत कामांची माहिती मनपाकडे अनुपलब्ध
u
सात महिन्यात एकच पाठ शिकवल्याने मराठी विषयात कमी गुण मिळाल्यास किंवा नापास झाल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असा इशारा पालकांनी दिला आहे. इंग्रजी आणि इतिहास विषयाचे शिक्षक किमान आता तरी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.
केवळ इंग्रजीला शिक्षक नाही
अंबुपाडा आश्रमशाळेत मराठी आणि इतिहास या विषयाला शिक्षक आहेत. इंग्रजी विषयासाठी सात महिन्यांहून अधिक कालावधी झाला असला तरी शिक्षक नाही. याविषयी प्रथम सत्राच्या परीक्षेआधी जिल्हास्तरावर ४१ आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत हा विषय मांडला. प्रकल्पस्तरावर मागणी करूनही अद्याप पूर्तता झालेली नाही. – एम. पी. बच्छाव (मुख्याध्यापक, अंबुपाडा आश्रमशाळा)