काही काळ वाहतूक कोंडी
दिंडोरी रस्त्यावरील नाशिक कृषी बाजार समितीच्या आवारात बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत चार गाळ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या गदारोळात परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पंचवटीतील मध्यवर्ती भागात बाजार समिती आहे. दिवसभर भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणावर आवक आणि लिलाव होत असल्याने माणसांचा कायम राबता असतो. दुपारी एकच्या सुमारास समितीतील एका दुकानास अचानक आग लागली. मागे लोकवस्ती असल्याने त्याची माहिती तातडीने अग्निशमन दलास देण्यात आली.
पंचवटी अग्निशमन विभागाचा पाण्याचा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता अन्य भागांतून आणखी मदत मागविण्यात आली.
वेगवेगळ्या भागांतून आलेल्या चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तासाभराने आग आटोक्यात आली. परंतु, तोपर्यंत चार गाळ्यांमधील लाखोचे साहित्य भस्मसात झाले. त्यात प्लास्टिक कॅरेट, पुठय़ाचे खोके, लाकडी खोके, प्लास्टिक शेड यासह अन्य साहित्याचा समावेश आहे.
दरम्यान, समितीच्या आवारात आग लागल्याचे समजल्यावर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी करण्यास सुरुवात केली. बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशमन विभागाच्या कामात अडचणी आल्या.
दुसरीकडे गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.