नाशिक : सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील अमृत गार्डन चौकात १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला अकस्मात झालेल्या गळतीची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली, परंतु त्यामुळे नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागात सात जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस विभागातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
मुख्य जलवाहिनीला लागलेल्या अकस्मात गळतीमुळे अनेक भागांतील नागरिकांना ऐन पावसाळय़ात टंचाईला तोंड द्यावे लागले. महापालिकेने सकाळी तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. गळतीचे काम २५ फूट खोल असून भर पाऊस व चिखलात ते करावे लागले. गळती मुख्य वाहिनीवर असल्याने दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा बंद ठेवून करावे लागले.
तातडीने अविरत काम करून बुधवारी सकाळी १० वाजता हे काम पूर्ण झाले. त्यामुळे नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागातील दादासाहेब गायकवाड जलकुंभ, आठ हजार वसाहत जलकुंभ, हाऊसिंग कॉलनी नवीन जलकुंभ, अमृतमणी जलकुंभ, महात्मानगर जलकुंभ, लवाटेनगर जलकुंभ, तिडके कॉलनी श्री मंडळ जलकुंभ भरता आले नाही. या जलकुंभावरून ज्या भागात पाणीपुरवठा होतो तो होऊ शकला नाही. पुढील दोन दिवस म्हणजे, गुरुवार आणि शुक्रवारी उपरोक्त भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
यामध्ये सातपूर विभागातील जुना प्रभाग क्रमांक ११ मधील सातपूर कॉलनी, पपया नर्सरी, त्र्यंबक रस्ता, महाराष्ट हौसिंग कॉलनी, सातपूर गाव, स्वारबाबानगर, महादेववाडी, जे. पी. नगर, सातपूर मळे विभाग, संतोषीमातानगर, गौतमनगर, कांबळेवाडी, सातपूर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिवकॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग, विकास कॉलनीचा समावेश आहे.
नाशिक पश्चिम विभागातील
जुना प्रभाग क्रमांक १२ मधील लवाटेनगर, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवासनगर, राहुल नगर, मुंबई नाका, मिलिंद नगर, मातोश्री नगर, महेश नगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, वनविहार कॉलनी, संत कबीरनगर, पारिजात नगर, समर्थनगर महात्मानगर परिसरात पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
टंचाईची गंगापूर रस्ता भागातही झळ
शहरात धो धो पाऊस कोसळत असताना गंगापूर रस्त्यावरील प्रभाग क्रमांक सात व आठमधील डीके नगर, नरसिंहनगर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. महिला वर्गाचे अतोनात हाल होत असल्याने माजी नगरसेविका स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेत या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे साकडे घातले. पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. प्रभाग सात आणि आठमधील अनेक भागात चार दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. या भागात पाणी पुरवठय़ाचा अन्य कोणताही स्त्रोत नसल्याने नागरिकांना मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागत असून बुधवारी त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी भामरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. भामरे यांनी १०० हून अधिक नागरिकांसह महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची भेट घेतली. कोणतेही तांत्रिक कारण नसताना अचानक अघोषित पाणी कपात का केली गेली, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आकाशवाणी टॉवर परिसरातील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर महापालिकेने जलकुंभ प्रस्तावित केलेला आहे. तो तातडीने उभारावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.