कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले, तर अमळनेरचा प्रताप महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
हेही वाचा- “शांतता समितीत युवावर्गाने सहभाग घ्यावा”; नाशिक पोलीस आयुक्तांचे आवाहन
महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे यांच्या उपस्थितीत झाला. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. सुधाकर चौधरी, समन्वयक प्रा. शंकर जाधव, सहसमन्वयक प्रा. राकेश तळेले आदींची उपस्थिती होती. यावेळी अभिनेता गौरव मोरे यांनी भाषणाची सुरुवात अहिराणीतून केली. सादरीकरणाच्या वेळी पडलेल्या टाळ्या म्हणजे पारितोषिक असते. पारितोषिक मिळाले नाही तरी शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश मिळेल, असा सल्ला देत आम्हीदेखील अशाच व्यासपीठावर कला सादर करून पुढे आलो आहोत. मात्र, मेहनत आणि परिश्रमाची तयारी ठेवा, असे सांगितले.
डॉ. उल्हास पाटील यांनी इतर कलावंतांकडून प्रेरणा घेतली तर यश नक्की मिळेल. पुढील युवारंगची जबाबदारी विद्यापीठाने आमच्या संस्थेकडे दिल्यास चांगले आयोजन करू, असे सांगितले. प्रदीप पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, प्र-कुलगुरू प्रा. इंगळे, प्रा. सुधाकर चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.