नाशिक – वाहन चालविण्याची आवड या एकमेव निकषाचा आधार घेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक मुलगी वाहन चालक होऊन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेते. तिच्या जिद्दीला कुटूंबियांची साथ मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील पहिली महिला बस चालक होण्याचा मान माधवी साळवे यांना मिळाला आहे.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी, असे म्हटले जाते. संत तुकडोजी महाराज यांचे हे विधान सार्थ ठरवित महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. आजपर्यंत कधी डांबरी, कधी काँक्रिटच्या तर कधी, ग्रामीण भागातील ओबडधोबड रस्त्यांवरुन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतही आता महिला दिसू लागल्या आहेत. याआधी बसची बेलदोरी हाती धरुन बसमध्ये वाहकाची कामगिरी सक्षमपणे पार पाडणाऱ्या महिलांच्या हाती आता बसचे स्टेअरिंगही आले आहे. एक महिला बस चालवित असल्याचे दुर्मिळ दृश्य खेड्यापाड्यात माधवी साळवे यांच्या रुपाने दिसू लागले आहे.
हेही वाचा >>>बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न
महामंडळाच्या नाशिक विभागाकडून १२ महिला प्रशिक्षणार्थींनी ३०० अधिक सेवापूर्व ८० दिवसांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत त्यांना कुठलेही वेतन अथवा प्रशिक्षण भत्ता दिला गेला नाही. आर्थिक अडथळ्यांची शर्यत पार करुन या महिलांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. महामंडळाने नुकताच वर्धापन दिन साजरा केला. यावेळी चालकपदाची धुरा महिलांच्या हाती देण्यात आली. प्रवासी वाहतूक करण्याची संधी मूळ त्र्यंबक तालुक्यातील महिरावणीच्या माधवी साळवे यांना मिळाली. नुकत्याच त्या सिन्नर आगारात सेवा बजावण्यासाठी रुजू झाल्या. सिन्नर तालुक्यातील प्रवाशांचे कौतुकाचे बोल सर्व महिला चालकांना प्रोत्साहन देत आहे.
हेही वाचा >>>धुळ्यातील वादग्रस्त स्मारक अखेर जमीनदोस्त
महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी देत आहे. प्रवाशांकडून याची प्रशंसा होत असून महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल आहे. याविषयी साळवे यांनी मनोगत मांडले. आपणास वाहन चालविण्याची आवड होती. त्यामुळे प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय पक्का केल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. या माध्यमातून कुटूंबाला आर्थिक हातभार लागणार असल्याचे समाधान अधिक आहे. सध्या सिन्नर-नाशिक अशा सहा फेऱ्या सुरू आहेत. दहा तास काम करण्यात येत आहे. याआधी नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बससेवेत दोन महिने काम केल्यामुळे काम करण्यास अडचण येत नाही, उलट आनंदच वाटत असल्याचे साळवे यांनी नमूद केले.