यावल तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्यांनी थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्ग रोखून रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी भेट दिली. त्यावेळी कर्मचार्यांनी घोषणाबाजी करीत अध्यक्षांना घेराव घातला. दुसरीकडे जळगावच्या आमदारांनी विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकारमंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली.
हेही वाचा >>>नाशिक : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याची धडपड
यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. त्याची ६३ कोटींना विक्री करण्यात आली आहे. या विक्री प्रक्रियेवर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने मंजुरी देण्यात आली होती. यामुळे बँकेचा तोटा कमी होऊन नफ्याकडे वाटचाल करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी म्हटले होते. जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमांतर्गत मधुकर कारखान्याची विक्री केली असून, नवीन मालकाकडून कारखाना यंदाच्या हंगामात सुरू करण्यात आला आहे. नवीन मालकांनी थकीत देणी देण्यास नकार दिल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.बुधवारी कर्मचार्यांनी अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रोखून धरला. जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनात खासदार रक्षा खडसे, अमोल जावळे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे आदींसह परिसरातील लोकप्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला.
हेही वाचा >>>नाशिक : शाखाध्यक्ष-इच्छुकांच्या चढाओढीत मनसेच्या राजदूताची नियुक्ती रखडली; अमित ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद
जिल्हा बँकेचे अध्यक्ष देवकर यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास कारखान्याला भेट दिली. कारखाना विक्री प्रक्रिया रद्द करण्याची कर्मचार्यांची प्रमुख मागणी होती. देवकर हे कर्मचार्यांशी चर्चा करण्यासाठी आले. मात्र, प्रवेशद्वारावरच आंदोलक कर्मचार्यांनी त्यांची गाडी अडवून रोष व्यक्त केला. त्यांना आंदोलनस्थळीच घेराव घालत संतप्त ऊस उत्पादकांसह कर्मचार्यांनी जाब विचारला. देवकरांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>>मॅकेट्रॉनिक्स, आयटी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची आखणी; राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाशिक केंद्रासाठी नियोजन
दरम्यान, सुरेश भोळे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. उस उत्पादकांसह कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात बाकी असताना फक्त १५ कोटी रुपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला, असा प्रश्न उपस्थित केला. कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत अनेक संशयास्पद बाबी असून, त्यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर सहकारमंत्री अतुल सावे यांनी या कारखान्याच्या विक्रीच्या निविदाप्रक्रियेला स्थगिती देण्यात येत असून, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली. यामुळे मधुकर कारखान्याची विक्री लिलाव प्रक्रिया तूर्तास टळली आहे.