जळगाव – जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडल्यावर गावठी बंदुकांची निर्मिती व तस्करी प्रकाशझोतात आली. त्यानंतर सीमावर्ती भागात वाढलेल्या गांजाच्या शेतीने आता सर्वांचे लक्ष्य वेधले असून, कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या शेतीचा बाजार रोखताना जळगावसह धुळे जिल्ह्यातील पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या रांगा व घनदाट जंगल आहे. याच भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत अवैध शस्त्रांसह अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रकार दोन्ही राज्यांच्या सीमेवर सतत सुरू असतो. विशेषतः मध्य प्रदेशात या प्रकारांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची झळ लगतच्या महाराष्ट्रातील जळगावसह धुळे जिल्ह्यांना बसते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात खासकरून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये राजरोसपणे गांजाची शेती करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शासनाकडून उपजिविकेसाठी मिळालेल्या वनपट्ट्यांवरही गांजाची शेती केली जात आहे.

दोन वर्षात सव्वादोन कोटीचा माल जप्त

शेतीत आंतरपीक किंवा सलग पीक म्हणून गांजाची लागवड केल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाला नशेच्या बाजारात पाच ते सहा हजार रुपये किलोचा भाव सहजपणे मिळतो. इतका चांगला भाव शेतीतून उत्पादित होणाऱ्या इतर कोणत्याच पिकाला कमी कालावधीत व कमी खर्चात मिळत नाही. त्यामुळे चोपडा तालुक्यातील सातपुड्यात किंवा पायथ्याशी शेती करणारे बरेच शेतकरी गांजाच्या शेतीकडे वळले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा ग्रामीण पोलिसांनी दोन वर्षात गांजाचे उत्पादन घेण्यासह गांजा बाळगल्याच्या प्रकरणात ११२ कारवाया करून सुमारे दोन कोटी १० लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील ४७ मोठ्या कारवायांमध्ये एकट्या चोपडा तालुक्यातील ३८ कारवायांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशच्या सीमेवरील चोपडा तालुक्यात गांजाची शेती करण्याचे प्रकार जास्तकरून आढळून येतात. त्यासंदर्भात माहिती मिळताच छापा टाकून एनडीपीएस कायद्यांतर्गत दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाते.

डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)