नाशिक – विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झालेली नसताना महाविकास आघाडी आणि महायुतीत रणकंदन सुरू झाले आहे. नाशिक मध्य मतदारसंघात सुमारे २४ हजार दुबार नावे असल्याची तक्रार महाविकास आघाडीने केल्यानंतर आता याच मुद्यावरून महायुतीचे नेते व पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. मालेगावमधील मतदारांची नावे नाशिक मध्य मतदारसंघात घुसविण्यात आल्याचा आक्षेप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाकडे नोंदविला आहे.

हेही वाचा >>> उदंड इच्छुकांमुळे नाशिकमध्ये भाजप फुटीच्या उंबरठ्यावर; गणेश गिते तुतारी हाती घेण्याची चिन्हे

याआधीच्या अनेक निवडणुकांमध्ये दुबार मतदार, मतदारांची नावे परस्पर गायब होणे, मयत मतदारांची नावे यादीत समाविष्ट असणे असे विविध प्रकार घडले आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ उडाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे प्रशासनाने आचारसंहिता लागू होताच मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. मतदार याद्याचा विषय राजकीय पक्षांंनी हाती घेतला आहे. अलीकडेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मध्यमधील यादीत २४ हजार दुबार नावे असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता महायुतीच्या आमदार फरांदे यांनी याच संदर्भात नाशिकचे प्रांताधिकारी अर्पित चौहान यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत २० हजार दुबार नावे असल्याची माहिती दिली गेली होती. यावर काय कारवाई झाली याची स्पष्टता झालेली नाही.

मुदतीत अर्ज देऊनही ती नावे वगळली गेली नाहीत. मालेगावमध्ये मतदार असणाऱ्या ७०० लोकांची नावे पुराव्यासह दिल्याचे फरांदे यांनी म्हटले आहे. १६२७ मतदारांची नावे, क्रमांक, छायाचित्र सर्व सारखे असूनही ती वगळली गेली नाहीत. या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही ती वगळली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. अनेक नावे याद्यांमधूनही गायब झाली आहेत. ती नावे पुन्हा जोडण्यासाठी अर्ज देण्यात आले. परंतु, ती जोडली गेली नाहीत. यामुळे प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात असून पुरवणी यादीत ती नावे जोडावीत अशी मागणी करण्यात आली. सदोष मतदार याद्यांना जबाबदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपने केली आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, चंद्रकांत खोडे, अनिल भालेराव आदी उपस्थित होते.