( नाशिक येथे बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो, भिक्खू, भन्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुरा विक्रमनायके, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार आदी उपस्थित होते.)
नाशिक – भगवान गौतम बुद्धांना ज्या महाबोधी वृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या वृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिकमध्ये होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल. बोधी वृक्षामुळे नाशिक हे जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार असल्याचा विश्वास बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमात व्यक्त झाला. केंद्र आणि राज्य सरकार “बुद्धिस्ट सर्किट” अंतर्गत पर्यटनाला चालना देत आहे. वेरुळ व अजिंठा लेण्यांना भेट तसेच पर्यटनासाठी बौद्ध अभ्यासक मोठय़ा संख्येने येतात. बोधी वृक्षामुळे अभ्यासक आणि पर्यटक नाशिककडे आकर्षित होतील. हे स्थळ बुध्दिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट करण्याचा विचार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केला आहे.
हेही वाचा >>>मराठा आरक्षण विषयक समितीचा अहवाल कधी मिळणार हे अस्पष्ट – गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र शासन आणि शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवारी त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले. यावेळी श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशातील भन्ते व उपासक, बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी बोधी वृक्षाच्या फांदीची मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वजवंदन करण्यात येऊन स्तुपात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करण्यात आले. नंतर फांदीचे रोपण करून कोनशिलेचे अनावरण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. या ऐतिहासिक रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकीक पुन्हा एकदा जगभर पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>नाशिक: सर्पदंशामुळे बालिकेचा मृत्यू
भुजबळ यांनी हा ऐतिहासिक क्षण असून बोधी वृक्षामुळे नाशिकच्या इतिहासात मोलाची भर पडल्याचे सांगितले. ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांचे विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यानिमित्ताने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात झाली असून ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.मंत्री महाजन यांनी या महोत्सवासाठी शासनाने १८ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध केल्याचे सांगितले. बोधी वृक्षामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री भुसे यांनी बोधी वृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो यांनी केले. आभार भिक्खू संघरत्न थेरो यांनी मानले.
भारत-श्रीलंका संबंध सुधारण्याचा सेतू
नाशिक येथे लावण्यात आलेले बोधी वृक्षाचे रोपटे भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध अधिक समृद्ध करण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारण्याचा सेतू ठरेल, अशी अपेक्षा श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुरा विक्रमनायके यांनी व्यक्त केली. सुमारे २३०० वर्षांपूर्वी भारतातून श्रीलंकेत नेण्यात आलेले रोपटे आता पुन्हा भारतात नाशिकमध्ये आणले जात आहे, मानवी जीवनात मनाने मनाशी साधलेला संवाद महत्वाचा आहे. बोधीवृक्ष शांततेचे प्रतीक आहे. या कार्यक्रमामुळे अनुराधापूर आणि नाशिक बरोबरच भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.