लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर सध्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबत प्रशासन उदासीन असतांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखाही कलाकारांच्या प्रश्नाबाबत बघ्याच्या भुमिकेत असल्याने कालिदास लागलेले असुविधेचे ग्रहण सुटणार कधी असा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
महाकवी कालिदास कलामंदिरत सांस्कृतिक घडामोडींचा आरसा आहे. या परिसरात गायन मैफल, नाट्य प्रयोग, व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, नाट्यप्रयोग होत राहतात. काही वर्षापूर्वी नऊ कोटी रुपये खर्च करत महापालिकेने कला मंदिराचे नुतनीकरण केले. करोना काळात दोन वर्ष कलामंदिर बंद होते. नुतनीकरणा नंतर कलामंदिर प्रेक्षकांसाठी खुले करत असतांना नव्याने देण्यात आलेली नियमावली ही जाचक ठरत होती. कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी, नियमांचा बागुलबुवा करूनही नुतनीकरणा नंतरही असुविधेचे ग्रहण कायम आहे. रविवारी वैभव मांगले यांच्या संज्या छायाचा प्रयोग कालिदास कलामंदिरात झाला. या वेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलाकारांसह प्रेक्षकही घामाघुम झाले. वास्तविक या ठिकाणी दोन वातानुकूलित यंत्रणा आहेत. मात्र दोन्ही बंद पडल्याने सर्वांचे हाल झाले. या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बंद असतांना फॅन चा पर्याय ठेवण्यात आलेला नाही. या सर्व प्रकाराला कंटाळत हा प्रयोग सादर होत असतांना ५० हून अधिक प्रेक्षकांनी पैसे परत घेतले. या मुळे कलाकारांचा हिरमोड तर झाला नाट्य निर्मातांचे आर्थिक नुकसान झाले ते वेगळे.
आणख वाचा-नाशिक : ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधकाला अटक
दुसरीकडे या ठिकाणी ध्वनी योजना, प्रकाश योजना, स्वच्छता गृह याची दुरावस्था आहे. तसेच कलाकार व प्रेक्षकांसाठी जेवणासाठी उपहार गृह नाही. या विषयी सातत्याने ओरड होत असताना महापालिका प्रशासन ढिम्म आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कलावंताची हक्काची संस्था असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आवाज उठवणे अपेक्षित असतांना परिषद केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. निवेदने देण्या पलिकडे परिषदेची मजल आजवर गेलेली नाही. सध्या उन्हाळी सुट्या सुरू आहेत. नाटयकाचे प्रयोगांना प्रतिसाद लाभत असतांना प्रशासन आणि नाट्य परिषदेची अनास्था महापालिकेच्या महसुलासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
अप्पर आयुक्तांना या सर्व प्रकरणा विषयी सुचना करण्यात आल्या आहेत. या मध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. -राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त , प्रभारी महापालिका आयुक्त