नाशिक : भगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी संशय असलेल्या वाल्मीक कराड यांचे समर्थक मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीर पाठराखण केल्याबद्दल संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांनचे विश्वस्त तथा सचिव तसेच राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा.अमर ठोंबरे यांनी निषेध केला आहे.
डॉ. नामदेवशास्त्री यांना संबंध महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे एक थोर निरूपणकार म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वरी आणि संत तुकोबारायांची गाथा या संत वाङ्मयाचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. असे असताना त्यांनी एका भ्रष्टाचारी मंत्र्याची पाठराखण करणे वाईट असून वारकरी संप्रदायाला ते शोभणारे नाही, असे प्रा. ठोंबरे यांनी नमूद केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांबाबत कधी निषेधाचा सूर महंतांनी आळवला नाही. भगवानगड आणि धनंजय मुंडे यांचे जुने संबंध आहेत. अनेक दिवसांपासून खंडणीखोर वाल्मीक कराड याच्या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुढे येत आहे. वारकरी संप्रदाय नामदेव शास्त्रींच्या भूमिकेमुळे संतप्त झाला आहे. ज्या वारकरी संप्रदायाने जातीभेदाचे नेहमी उच्चाटन केले, त्या वारकरी संप्रदायाचे धुरीण जर भ्रष्टाचार करणाऱ्याची बाजू घेत असतील, खंडणीखोरांचे पाठराखे होत असतील तर यासारखे दुर्दैव काय, असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. नामदेवशास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.