नाशिक – देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्राला (ईव्हीएम) हद्दपार करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ यांच्यावतीने शुक्रवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढली गेली. मोर्चात पराभूत उमेदवारांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्र्यंबक रस्त्यावरील ईदगाह मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. ट्रॅक्टरवर ठेवलेल्या तिरडीत मतदान यंत्राची प्रतिकृती आणि या यंत्राविरोधात शेकडो फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. मध्यवर्ती रस्त्यांवरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद असून त्यावर कोणी विश्वास ठेवण्यास तयार नाही, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. देशाचे संविधान वाचविणे महत्वाचे आहे. देश एकाधिकारशाहीकडे जाऊ नये, सर्व जाती-धर्माची माणसे एकोप्याने राहिली पाहिजेत. कोणावरही अन्याय होता कामा नये, यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराजबाबा मराठे आणि भारतीय वारकरी विकास मंडळाचे सदस्य जनार्दन बळीराम महाराज कांदे ( काकडे महाराज ) यांनी सांगितले.

हेही वाचा >>>गोदावरीतील पाणवेली काढण्यासाठी पुन्हा सव्वा दोन कोटींचा खर्च; ट्रॅशस्किमर यंत्र चालवणे, देखभाल-दुरुस्तीचे आव्हान

लोकशाही वाचविण्यासाठी मतदान यंत्र हटवून कागदी मतपत्रिकेवर निवडणूक होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने यापुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेऊन मतदारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने मतदान यंत्र हद्दपार न केल्यास पुढील काळात आणखी तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चेकरी आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरवरील मतदान यंत्राची प्रतिकृती जप्त केली.

विरोधी पक्षांचा प्रभाव

मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे आयोजकांनी म्हटले होते. जनतेला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, मोर्चावर विरोधी पक्षांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. मनसेचे दिनकर पाटील, प्रसाद सानप, राष्ट्रवादीचे (शरद पवार) गणेश गिते, माकपचे जे. पी. गावित, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनिल कदम या पराभूत उमेदवारांसह विरोधी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासीबहुल भागातून मोर्चासाठी वाहने भरून लोकांना आणण्यात आले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahanubhav parishad and warkari panth hold protest at district collector office against evm scam nashik news amy