टपाल तिकिटांचा संग्रह (फिलाटेली) याची ओळखच मुळात ‘राजांचा छंद आणि छंदांचा राजा’ अशी. बालपणी बहुतेकांनी तो जोपासलेला. कालौघात त्यापासून काही दुरावलेदेखील. वास्तविक देशाचा वारसा, इतिहास, नैसर्गिक देणगी, कला-साहित्य आणि संस्कृती चित्रित करणारी टपाल तिकिटे देशातील व्यक्ती, संस्था व संघटनांना सन्मानित करण्याचे एक प्रतीकात्मक साधन आहे. फिलाटेलीचा प्रयोग मुलांचे मानसिक क्षितिज विस्तृत करण्यासाठी प्रभावी शैक्षणिक साधनांच्या स्वरूपात होत आहे. शालेय विद्यार्थी व तरुणाईत सर्जनात्मकता निर्माण होऊन त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने‘महापेक्स २०१६’ या राज्यस्तरीय फिलाटेली प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना या छंदाकडे आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १६ व १८ जानेवारी या कालावधीत येथे होणाऱ्या या स्पर्धात्मक प्रदर्शनाच्या माध्यमातून टपाल तिकिटांचा दुर्मीळ खजिना अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्र व गोवा यासाठी होणारे हे प्रदर्शन तब्बल १७ वर्षांनंतर नाशिकमध्ये होत आहे. उपनगरच्या पोस्टल स्टोअर डेपो सभागृहात होणाऱ्या प्रदर्शनात स्थानिकांसह राज्यातील काही प्रसिद्ध तिकीट संग्राहकांना त्यांचा अनोखा संग्रह सादर करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या बाबतची माहिती महाराष्ट्राचे मुख्य पोस्ट मास्तर डी. के. दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्तर गणेश सावळेश्वरकर उपस्थित होते. फिलाटेलीबद्दल जनजागृती करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. टपाल तिकिटांचा संग्रह करणे हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय छंद आहे. देशात जवळपास ५० लाख संग्रहणकर्ता तो जोपासतात. एखाद्या लहानशा टपाल तिकिटावर विविध विषयांची माहिती असू शकते, त्याची कल्पना करता येत नाही. इतिहास आणि वर्तमानातील उपलब्धींची माहिती यानिमित्ताने होईल. या स्पर्धात्मक प्रदर्शनात राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील संग्राहक सहभागी होऊ शकतात. त्या संदर्भातील नियमावली इंडिया पोस्टच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रदर्शनात एकूण ४०० फ्रेमद्वारे तिकिटांचा संग्रह सादर केला जाईल. त्यात काही फ्रेम या निमंत्रित प्रसिद्ध संग्राहक, तर काही स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनादरम्यान विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात वरिष्ठ संग्राहकांतर्फे फिलाटेलीवर मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश आहे. फिलाटेलीवर साहित्य आणि महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित विषयांवर टपाल तिकिटांचा इतिहास आणि टपाल तिकिटांचा इतिहास व त्यांच्या रद्दकरणाच्या माहितीचा अंतर्भाव असणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. स्पर्धात्मक प्रदर्शनाद्वारे संग्राहकांना पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळते, असे सावळेश्वरकर यांनी नमूद केले.
डॉ. आनंदीबाई जोशी, पांडवलेणी यांचे विशेष पाकीट
या प्रदर्शनाच्या निमित्ताने टपाल विभागातर्फे चार ते पाच विशेष पाकिटे काढण्यात येणार आहेत. त्यात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा समावेश असेल. नाशिकला प्रदर्शन होत असल्याने या भागातील पांडवलेणीची माहिती देणाऱ्या पाकिटाचाही समावेश राहील. इतर दोन ते तीन विशेष पाकिटांसाठी नाशिकशी निगडित विषयांची निवड स्थानिक तिकीट संग्राहकांशी चर्चा करून करण्यात येईल.