नाशिक – एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी आणि सर्वांना आनंद मिळावा, यासाठी सण, उत्सव, समारंभ साजरे करणे अतिशय महत्त्वाचे असते. परंतु, हे सण, उत्सव,समारंभ साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील, याचे भान ठेवणे, काळजी घेणेही अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने होळी पर्यावरणपूरक साजरी करतांना होळीत नैवेद्य म्हणून टाकण्यात येणारी पुरणपोळी होळीत न टाकता ती दान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नाशिक : इच्छामरणासाठी चांदवडच्या १०१ शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३० वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबद्दलचे संकल्पपत्र स्वेच्छेने भरून घेतले जातात. यावर्षीही महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने ”होळी करा लहान, पोळी करा दान ” उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटूंब, अनाथाश्रम, वृद्धाश्रमामध्ये वाटप करून त्यांच्या पोटातील भुकेची आग शमविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माणसातील दुर्गुणांची होळी करावी, असा नितीयुक्त संदेश देणारा होळीचा सण आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, गोवऱ्या जाळून चढाओढीने साजरा केला जातो.
हेही वाचा >>> नाशिक : नाफेडची कांदा खरेदी थांबविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांना घेराव
प्रत्यक्ष होळी पेटली असताना, होळीत नारळ, खोबरे आणि पुरणपोळी असे खाद्यपदार्थ टाकून जाळले जातात. होळी जवळच अर्वाच्च बोंबा मारल्या जातात. होळीनंतर येणारा रंगपंचमी हा सणही प्रचंड पाण्याची नासाडी करणारा असून, रासायनिक रंगाने रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर होतोच, शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही असतो. म्हणून एका गावात, काॅलनीत, गल्लीत एकच लहान, प्रतिकात्मक होळी करावी, होळीसाठी लाकूड , गोवऱ्या जाळू नयेत, पुरणपोळी, नारळ, खोबरे असे खाद्यपदार्थ होळीत टाकण्याऐवजी त्यांचे गरजू व गरीब कुटुंबांमध्ये वाटप करावे, कुणाबाबतही अर्वाच्च शब्द उच्चारू नयेत. पाणी आणि रासायनिक रंगांऐवजी फक्त वनस्पती रंग वापरून पाण्याशिवाय रंगपंचमी खेळावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक जिल्ह्याच्या वतीने राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.