जळगाव – उलेमा संघटनेने काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. वास्तविक ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पूर्ण झालेली असताना त्यात आणखी वाढ करायची असल्यास इतर मागास, दलित, आदिवासींचे आरक्षण कमी करावे लागेल. भाजप संसद आणि विधानसभेमध्ये जोपर्यंत प्रतिनिधीत्व करत आहे, तोपर्यंत अल्पसंख्यांकाना कधीच आरक्षण मिळू दिले जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केली.

महायुतीच्या जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ यावल तालुक्यातील फैजपूर येथे अमित शहा यांची रविवारी दुपारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपची अल्पसंख्यांकांना आरक्षण विरोधी भूमिका जाहीर केली. शिवप्रताप दिनी होत असलेल्या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाच्या सिद्धांतावर चालणारे महायुतीचे सरकार बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन शहा यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

हेही वाचा >>> नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांतांचे पालन करून महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्याचे ध्येय महायुतीसमोर आहे. आमची युती महाराष्ट्राला समृद्ध बनविण्यासाठी आहे. मात्र, प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे ध्येय फक्त सत्ताप्राप्ती हेच आहे. मविआचे सरकार राज्याचा विकास करण्याच्या गोष्टी करत आहे; मात्र, तुमच्याकडे यापूर्वी देखील सत्ता होती तेव्हा तु्म्ही काय केले, असा प्रश्न शहा यांनी केला. काँग्रेसस शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्र लढत आहेत. राहुल गांधी तर थेट सावकरकरांचा विरोध करतात. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर, त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी दोन चांगले शब्द वदवून दाखवावेत, असे आव्हान शहा यांनी दिले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये वक्फ मंडळाला सरकारी तसेच खासगी जमिनी मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्रातही वक्फ मंडळाला मुक्तहस्ते जमिनी दिल्या जातील, असा आरोप शहा यांनी केला. यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, भाजपचे नेते गिरीश महाजन तसेच महायुतीचे जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित होते.

Story img Loader