नाशिक – विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी १२४९ केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली चार हजारहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय पथक व गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. महत्वाच्या ३९ ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २५ तुकड्या आणि याच दलाची सात पथके फिरती राहणार आहेत. याशिवाय, १२ स्ट्रायकिंग दल आणि तीन जलद प्रतिसाद पथके राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्त, चार उपायुक्त, सात सहायक आयुक्त, ५४ निरीक्षक, १३४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २३१७ अमलदार, ४५० गृहरक्षक दलाचे जवान, ५५० गुजरातचे गृहरक्षक, १३० नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक, दोन बॉम्बशोधक व नाशक पथक, दोन दंगल नियंत्रण पथक, तीन जलद प्रतिसाद पथक, चार राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि सीएपीएफच्या पाच तुकड्या यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात बुधवारी मतदान; ५० लाखहून अधिक मतदार, मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास बंदी

मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी ९८४ अमलदार, ८६४ गृहरक्षक दलाचे जवान, तसेच १०० मीटर बंदोबस्तासाठी ६६ पोलीस अधिकारी १३१ अमलदार व गृहरक्षक दलाचे जवान आणि तीन जलद प्रतिसाद पथक राहतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर १२ स्ट्रायकिंग दल आणि महत्वाच्या ३९ ठिकाणी सीएपीएफची २५ सेक्शन व सीएपीएफचीी सात पथके फिरती राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे. नागरिकांनी निर्भिडपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आचारसंहिता उल्लंघन रोखण्यासाठी ६४ पथके

आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मतदारसंघनिहाय तक्रार निवारण कक्ष स्थापन करून ६४ पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रभावी गस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातंर्गत मतदारसंघनिहाय तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून पद्मजा बढे ९६५७६८९५९५, नाशिक मध्य – नितीन जाधव ९८९०९४४९३४, नाशिक पश्चिम- शेखर देशमुख – ८७६६८३८४०१ आणि देवळाली मतदारसंघासाठी सचिन बारी ९५५२२७३१०० या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाणेनिहाय एकूण २९ बीटमार्शल व ३५ गस्ती वाहने अशी एकूण ६४ पथके तैनात राहणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होताना आढळल्यास नागरिकांनी ०२५३ – २३०५२३३, २३०५२३४,२३१८२३८ आणि ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.