नाशिक – नामसाधर्म्य आणि पिपाणी या चिन्हावर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवाराच्या मताधिक्याला सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व आणि नांदगाव मतदारसंघात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तशीच खेळी खेळली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या तीन जणांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत तिसरी उत्तीर्ण अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) यांच्यामुळे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचे मताधिक्य एक लाखाने घटले होते. नामसाधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाच्या राज्यातील अन्य उमेदवारांना कमी-अधिक प्रमाणात झळ बसली होती. विधानसभा निवडणुकीत हाच प्रयोग काही जागांवर होत आहे. नांदगाव विधानसभेची निवडणूक दमदाटी, धमक्या, आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आ. सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा (अजित पवार) राजीनामा देत शड्डू ठोकणारे समीर भुजबळ आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) गणेश धात्रक यांच्यात ही लढत होत आहे. या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील सुहास कांदे आणि दिंडोरी तालुक्यातील गणेश धात्रक या नावाच्या अन्य दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. या दोघा अपक्षांच्या जीवाला धोका असल्याची माहिती भुजबळ यांनी दिल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना अर्ज भरल्यानंतर बंदोबस्तात बाहेर नेले.

हेही वाचा – बंडोंबांना थंड करण्‍याची मोहीम सुरू; अनेक ठिकाणी संघर्ष अटळ

आपलेच नाव असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उभे करण्याच्या कृतीवरून खुद्द आमदार कांदेंनी समीर भुजबळ यांच्यावर आगपाखड केली. या जागेवर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार गणेश धात्रक यांच्या नावाशी साधर्म्य साधणारा एक अपक्ष उमेदवार असून त्याचा अर्ज कोणी भरला, असा प्रश्न करीत छगन भुजबळ यांनी आमदार कांदेंना त्यासाठी जबाबदार ठरविले. दिंडोरीत भगरेंपासून मुख्यत्वे याची सुरुवात झाली. निवडणुकीतील ही एक खेळी असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – स्वपक्षातील बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी कसरत! महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजांची मनधरणी सुरू

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते आणि महायुतीचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यात सामना होत आहे. या मतदारसंघात इगतपुरी तालुक्यातील गणेश गिते नामक उमेदवारानेही अपक्ष उमेदवारी केली आहे. आपण निवडून येऊ, अशी भाजपच्या उमेदवाराला भीती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या व्यक्तीला अपक्ष उमेदवारी करायला लावल्याचा आरोप महाविकास आघाडीचे गणेश गिते यांनी केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election name similarity tactics again in nashik ssb