नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेची जागा कुणाकडे जाईल, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांसह भाजपची संसदीय समिती घेईल. नाशिकची जागा शिंदे गटाकडे गेली किंवा अन्य काही जागा अजित दादा यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्या तरी त्या, त्या ठिकाणी मित्र पक्षांना ताकद देणे ही भाजपची जबाबदारी आहे. केवळ लोकसभा नव्हे, तर विधानसभा, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पक्ष संघटना मजबूत करत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
एक दिवसीय दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांचे सर्व कार्यक्रम केवळ नाशिक लोकसभा मतदार संघात होते. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या दिंडोरी मतदार संघात एकही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यातून भाजपने केवळ नाशिकवर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याचे अधोरेखीत झाले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटन, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरात केंद्रस्तरीय कार्यकर्त्यांची (बूथ वॉरिअर्स) बैठक, घर चलो अभियान, नागरिकांशी सुसंवाद, कामगार मेळावा अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील तीन आणि देवळाली विधानसभा मतदार संघांतर्गत हे कार्यक्रम दर्शविले गेले असले तरी हा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर; १४ धरणांमधून विसर्ग
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोणताही कार्यक्रम नव्हता. नाशिकमधील कार्यक्रम झाल्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होणार असल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले होते. युतीत नाशिक लोकसभेच्या जागेवर अनेक वर्षांपासून शिवसेना लढत आहे. यात बदल होणार का, यावर बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जागेसंबंधीचे सर्व निर्णय महायुतीतील प्रमुख नेत्यांमार्फत घेतले जातील, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा : नाशिक : ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान ; स्वच्छता ही सेवा अभियान
सध्या मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारपर्यंत मांडला जात आहे. नाशिकप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी रोहित पवार यांना दिवसा स्वप्न पाहू नये, असा सल्ला दिला. श्रीकांत शिंदे हे प्रभावी खासदार असून ते ५१ टक्के मते घेऊन निवडून येतील. अशा काही जागांवर महायुतीचा उमेदवार एकतर्फी निवडून येईल. अन्यत्र तिन्ही पक्षांचे नेते व संसदीय समिती निर्णय घेईल. शेवटी महायुतीला निवडून आणायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी संघटनात्मक तयारी करण्यात आली आहे. हिंदू संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते उत्तर देणे टाळत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी हे नेते इंडिया आघाडीतून बाहेर पडत नसल्याचा आरोप बानवकुळे यांनी केला. पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये कुठलेही वाद नसून योग्य वेळी मुख्यमंत्री ते जाहीर करतील, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा : शबरी योजनेंतर्गत घरकुलासाठी आंदोलन; नाशिकसह इगतपुरीत ठिय्या आंदोलन
पत्रकारांविषयीच्या विधानात गैर काय ?
भाजपविरोधात पत्रकारांनी बातमी छापू नये, याविषयी अहमदनगर येथील मेळाव्यात केलेल्या विधानावरून वाद उफाळल्यानंतर बावनकुळे यांना पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सरकार चांगली कामे करत असताना नकारात्मक बातम्या कशा येतात, त्यांचा सन्मान करा, त्यांच्याकडे चहा प्यायला जा अथवा त्यांना तुम्ही बोलवा, असे आपण सांगितले होते. पत्रकारही एक मतदार आहेत, त्यांची मते जाणून घ्या. सरकारविषयी चुकीच्या, एकतर्फी बातम्या येऊ नयेत. अशा बातम्यांमध्ये आपले म्हणणे, बाजू मांडली गेली पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. यात गैर काय, असे ते म्हणाले.