नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकाल पथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी १४६ कोटी, नमामि गोदा प्रकल्पाचा आराखडा आदींचा समावेश यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले असले तरी विरोधी पक्षांनी मात्र कुंभमेळ्यातील विकास कामांसाठी भरीव निधीची घोषणा झाली नसल्याची टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मंत्रिपद न मिळाल्याने काही महिन्यांपासून भुजबळ-अजितदादा यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. या काळात भुजबळ हे भाजपच्या अधिक जवळ गेले. त्यामुळे ते पक्षांतर करतील, असे अंदाज बांधले गेले. या घटनाक्रमात भुजबळांनी अजितदादांचे कौतुक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासह नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नाही, तर हा संपूर्ण राज्याच्या भविष्याचा सक्षम आराखडा असल्याचे म्हटले आहे. लाडकी बहीण योजना केवळ महिलांना आर्थिक बळकटी देणारी नव्हे, तर त्यांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची हमी देणारी आहे. कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्याची योजना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असल्याचे हिरे यांनी सांगितले.

कुंभमेळ्यासाठी निधीची व्यवस्था नसल्याचा आक्षेप

शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उपनेते सुधाकर बडगुजर यांनी कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची घोषणा झाली. मात्र विकास कामांसाठी निधीची व्यवस्था झाली नसल्याकडे लक्ष वेधले. प्राधिकरणामुळे स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज त्यांनी मांडली. काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी सर्वसामान्यांचा विचार नसलेला पंचतारांकित अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात सामान्य माणसांचा विचार नाही. मुद्रांक शुल्क वाढवून परत सामान्य माणसावर बोजा ठेवला गेला. सर्व घोषणा या पंचतारांकित व्यवस्थेसाठी आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल तूट असल्याने सर्व योजना पूर्ण होऊ शकणार नाहीत. दिशाहीन व दिलेली आश्वासने पूर्ण न होणारा हा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याचे छाजेड यांनी म्हटले आहे.

Story img Loader