माता व बाल मृत्यू कमी करण्यासाठी योजना
आदिवासीबहुल भागात कुपोषण आणि अन्य कारणांस्तव माता व बाल मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारच्या मान्यतेने जिल्हा शासकीय रुग्णालयात राज्यात प्रथमच माता बाल संगोपन केंद्र आकारास येत आहे. यामुळे माता व बाल मृत्यूवर नियंत्रण मिळवता येईल तसेच गरोदरपूर्व काळात तसेच प्रसूतीनंतर नवजात शिशूला अधिकाधिक आरोग्य विषयक अत्याधुनिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सध्या राज्यात कुपोषणाच्या मुद्यावरून रणकंदन सुरू आहे. केंद्र सरकारने यादृष्टिने काही वर्षांपूर्वीच माता-बालक यांच्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास नाशिक विभागात आदिवासीबहुल भाग अधिक असल्याने माता बाल मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. नाशिक विभागात ६८ लाख गरोदर मातांमागे ३६८ माता आणि एक हजार नवजात शिशुमागे १८ बालकांचा मृत्यू असे प्रमाण आहे. ही बाब लक्षात घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी माता बालसंगोपन विशेष कक्ष उभारण्यासाठी नाशिकची निवड झाली. शासकीय रुग्णालयाच्या आवारात १०० खाटांच्या विशेष महिला कक्षासह तेवढीच इमारत माता बालसंगोपन विभागासाठी राहणार आहे. मागील वर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात २०० खाटांचा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला. त्या कक्षा शेजारीच महिलांसाठी हा विशेष कक्ष आकाराला येत आहे. यासाठी केंद्र सरकारने २६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कक्षाचा विशेष आराखडा तयार झाला असून त्यास आरोग्य विभागासह संबंधित विभागाची मान्यता मिळाली आहे. या शिवाय मनुष्यबळासाठी काम प्रलंबित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांच्या नियुक्तीचे काम हाती घेतले आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर या कामास लवकरच सुरुवात होऊन वर्षभरात या ठिकाणी केंद्र कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. केंद्राच्या माध्यमातून गरोदरपूर्व, गरोदरपणात तसेच प्रसूती झाल्यानंतर वेगवेगळ्या आरोग्य विषयक सुविधा दिल्या जातील. मातांची रक्त तपासणी, त्यांना आवश्यक औषधोपचार, त्या संबंधीच्या तपासण्या यासह आवश्यक चाचण्या करण्यात येतील. प्रकृती नाजुक असणाऱ्या मातांसाठी अतिदक्षता विभाग, त्यांना आहार विषयक मार्गदर्शन अशी विविध कामे या ठिकाणी केली जातील. बालकांमधील कुपोषण, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, खेळणीघर, नवजात शिशुवर विशेष उपचार करता यावे यासाठी ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ या ठिकाणी राहील.
नाशिक विभागासाठी लाभदायक
नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार, अहमदनगर या भागातील माता व बालकांना गरज असल्यास या कक्षात विशेष उपचार करण्यात येतील. आरोग्य विभागाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी आर्थिक निधी मंजूर झाला असून सर्व विभागांची मान्यता घेण्यात आली आहे.
– डॉ. सुरेश जगदाळे (जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा रुग्णालय)