येथील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. जळगावला कार्यरत राजेंद्र वाघ हे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा काढले. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळतो. परंतु, मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाले. नंतर करोनाचे सावट उभे ठाकले. यात बदल्यांचा विषय रखडला होता. अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही बदल्या होत नसल्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त झाले. अखेर हा प्रश्न शासनाने बदल्यांचे आदेश काढत मार्गी लावला. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा काढण्यात आले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरसीकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी माळी, गणेश मिसाळ, निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांची बदली करण्यात आली आहे.
नरसीकर यांना अहमदनगरला उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर नियुक्ती मिळाली. गावंडे हे धुळ्यात रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. वासंती माळी यांना नाशिकमध्येच वन जमाबंदी अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती मिळाली. डोईफोडे, पठारे, मिसाळ हे नियुक्ती आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तेजस चव्हाण यांना पालघरला पुनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती झाली. वाघ हे जळगाव येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत होते. धुळे येथे पुरवठा अधिकारी असलेले मिसाळ हे आता नाशिकचे पुरवठा अधिकारी म्हणून काम बघतील. येवला उपविभागीय अधिकारीपद अनेक दिवस रिक्त होते. या जागी बाबासाहेब गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली. निफाडच्या उपविभागीय अधिकारी पदावर हेमांगी पाटील यांची नियुक्ती झाली. त्या धुळ्यात महसूल प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होत्या.